नवी दिल्ली: LPG Cylinder Price Hike: पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच देशात महागाईचा भडका उडायला सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या किंमती वाढवल्या आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ केली आहे.
आखाती युद्धामुळे जगभरात निर्माण झालेल्या तणावामुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी 1 मे पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत थेट 993 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबईसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत थेट 3 हजारांच्या वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सध्यातरी कुठलाही बदल करण्यात आलेला नसल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम पडणार नाही.
कोणत्या शहरात कितीने वाढल्या किंमती?
आज झालेल्या वाढीमुळे देशभरात 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत पहिल्यांदाच तीन हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची नवीन किंमत आता ₹3071.50 झाली आहे, जी पूर्वी ₹2078.50 होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2031 रुपयांवरून वाढून थेट 3024 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकाता येथे आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2 हजार 208 रुपयांवरून वाढून थेट 3 हजार 202 रुपयांवर पोहोचली आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3 हजार 237 रुपयांवर पोहोचली आहे.
मात्र, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत अपरिवर्तित राहिली आहे. या दरवाढीचा सर्वसामान्य ग्राहकांवर थेट परिणाम होणार नाही.

