जेएनएन, पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा 18 वर पोहोचला असून पाच जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासात गावठी दारूमध्ये घातक मिथेनॉल मिसळण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणातील मुख्य पुरवठादारासह अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी, दापोडी तसेच पुण्यातील हडपसर आणि काळेपडळ परिसरात एकाच साखळीमार्फत गावठी दारूचा पुरवठा करण्यात आला होता. ही दारू सेवन केल्यानंतर अनेकांना तीव्र पोटदुखी, उलट्या, चक्कर येणे आणि दृष्टीदोषाची लक्षणे दिसून आली. उपचारादरम्यान 18 जणांचा मृत्यू झाला, तर काही रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिथेनॉलमुळे मृत्यू झाल्याचा संशय बळावला
राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या तपासात दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन असून त्याचे सेवन केल्यास अंधत्व, अवयव निकामी होणे आणि मृत्यू ओढवू शकतो. फॉरेन्सिक तपासणीचे अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित असले तरी प्राथमिक पुरावे मिथेनॉलकडेच बोट दाखवत आहेत.
आठ आरोपी जेरबंद, मुख्य पुरवठादार अटकेत
या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. योगेश वानखेडे हा मुख्य पुरवठादार असल्याचे समोर आले असून त्याने फुगेवाडी आणि हडपसर या दोन्ही भागांत दारूचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून संपूर्ण अवैध दारू रॅकेटचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
पोलीस विभागात खळबळ; तीन अधिकारी निलंबित
या प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पावले उचलत हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मुख्यमंत्रीकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अवैध दारू निर्मिती, पुरवठा आणि विक्रीशी संबंधित संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आलले आहे.दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सलग दोन दिवसांत 18 जणांचा बळी गेल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषारी दारूमुळे झालेली ही दुर्घटना राज्यातील अवैध मद्यव्यवसायावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली असून संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा: Pune Liquor Tragedy: पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूने मृत्यूचे तांडव; चालत घरी आले, तोंडाला फेस आला अन् सोडले प्राण, आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू

