जेएनएन, पुणे. Pune Minor Rape Murder Case: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, शुक्रवारी 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
यादरम्यान, आता या मुलीचा पोस्टमार्टेम अहवाल (Pune Minor Rape Murder Case post-mortem Report) समोर आला असून, त्यामधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
पोस्टमार्टेम अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर
ससून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना सोपवलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून अंगावर शहारे आणणारी माहिती समोर आली आहे. 65 वर्षांच्या नराधम आरोपीने या चिमुरडीचा आवाज दाबण्यासाठी आणि तिची निर्घृण हत्या करण्यासाठी तिच्या तोंडात पाय मोजा (Socks) कोंबल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे.
पीडित मुलीच्या शरीरावर आणि विशेषतः छातीवर मारहाणीचे गंभीर वळ उमटले आहेत. आरोपीने केवळ लैंगिक अत्याचारच केला नाही, तर मुलीने प्रतिकार करू नये किंवा तिचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी अत्यंत अमानवीय मार्गाचा अवलंब केला. त्याबरोबरच आरोपीने हत्या करण्याआधी या मुलीला निर्दयीपणे मारहाण केल्याचेही उघडकीस आले आहे.
काय आहे प्रकरण:
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका गावात चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपी भीमराव कांबळे अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने तिला जेवणाचे आमिष दाखवून बोलावले, तिला गुरांच्या गोठ्यात नेले, तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर दगडाने मारून तिची हत्या केली. आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हेही वाचा - Pune Minor Rape Murder Case: 'त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारा'; आरोपीच्या पत्नी-मुलाने व्यक्त केला संताप

