Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Suman Kalyanpur Passes Away: संगीताचे 'सुमन' कोमेजले! पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन

Suman Kalyanpur Passes Away: संगीताचे 'सुमन' कोमेजले! पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन

Jagran Marathi 1 week ago

जेएनएन, मुंबई. Suman Kalyanpur Death: ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले आहे. रविवारी (३१ मे) मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.

सुमन कल्याणपूर यांनी १९५० ते १९७० च्या दशकात आपल्या मधुर आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे', 'ना ना करते प्यार', 'तुमने पुकारा और हम चले आए' यांसारखी अनेक अजरामर गाणी त्यांनी गायली. त्यांच्या आवाजाची तुलना अनेकदा लता मंगेशकर यांच्याशी केली जात असे.

संगीत क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २०२३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सांस्कृतिक आणि कलाविश्वातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल 'सुमन' असा स्वर आज शांत झाला, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, सुमनजींनी प्रारंभी चित्रकलेचेही शिक्षण घेतले. पण त्या रमल्या सुरावटींच्या दुनियेत. पुढे त्यांनी रसिकांच्या मनावर आपल्या मधाळ आणि शास्त्रीय सुरांनी सहा दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवले. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपल्या अवीट गोडीच्या सुरांनी भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका 'पद्मभूषण' सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीताचे 'सुमन' कोमेजले असून त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याणपूर यांच्यावर सोमवारी सकाळी 11.30 ते दुपारी 12.00 च्या दरम्यान पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात मुलगी चारू आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi