Dailyhunt
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; कोणत्या पक्षाकडून कोण होणार आमदार? पाहा संपूर्ण यादी

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; कोणत्या पक्षाकडून कोण होणार आमदार? पाहा संपूर्ण यादी

Jagran Marathi 1 week ago

मुंबई. Maharashtra Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महायुती व महाविकास आघाडीने अकरावा उमेदवार मैदानात न न उतरवल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचे निश्चित झाले आहे.

विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (गुरुवार) दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या वाट्याला सहा, शिंदेसेनेला दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारआणि मविआच्या वाट्याला एक जागा आली आहे. महायुती आणि मविआने आपआपल्या उमेदवारांची घोषणा केली असून कोणत्याही राजकीय पक्षाने अतिरिक्त उमेदवार न दिल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार गरज पडल्यास 12मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. आता राजकीय पक्षांच्या 10 उमेदवारांची नावे निश्चित झाली असली तर तीन अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. मात्र त्यांना आवश्यक असलेल्या 10 आमदारांच्या सूचक स्वाक्षऱ्या नसल्याने त्यांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या छाननीमध्ये बाद ठरवले जातील व निवडणूक बिनविरोध जाहीर होईल. 2 मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून 4 मे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

काँग्रेसने माघार घेताच निवडणुकीचे चित्र स्पष्ट-

विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरी सुरू होत्या. ठाकरे सेनेने कुठलीही चर्चा न करता परस्पर अंबादास दानवे यांची उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसचे नेते नाराज झाले होते. त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, आज सकाळी ठाकरे सेनेचे नेते अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई आणि सचिन आहिर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची विधानभवनातील कार्यलयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी उमेदवार न देण्याची विनंती केली. त्यानंतर काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेत अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला व निवडणुकीचे चित्र पुरेसे स्पष्ट झाले.

कोणत्या पक्षाकडून कोण होणार आमदार?

भाजपचे उमेदवार -

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 6 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.

  1. सुनील कर्जतकर
  2. माधवी नाईक
  3. संजय भेंडे
  4. विवेक कोल्हे
  5. प्रमोद जठार आणि पोटनिवडणुकीसाठी
  6. प्रज्ञा सातव यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार -

शिवसेना शिंदे गटाने

  1. डॉ. नीलम गोऱ्हे आणि
  2. बच्चू कडू यांना संधी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार -

  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी यांना संधी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार -

  • महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

विजयासाठी किती मतांचा कोटा आवश्यक?

विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 28 मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या विधानसभेत महायुतीमधील भाजपकडे 131 आमदार आहेत. तर शिंदे सेनेकडे 57, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 40 तर महाविकास आघाडीतील ठाकरे सेनेकडे 20, काँग्रेसकडे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. त्यामुळे संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीचे आठ आणि मविआचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.

या निवडणुकीच्या निमित्ताने विधानपरिषदेतील अनेक दिग्गजांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. यातील नीलम गोऱ्हे पुन्हा आमदार म्हणून विधानपरिषदेत जात आहेत.

हे ही वाचा -MLC Election: अखेर तिढा सुटला.. विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, ठाकरेंचे अंबादास दानवे मविआचे अधिकृत उमेदवार

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi