Dailyhunt
Watermelon Death Cae: 4 जणांच्या मृत्यूचं कारण अजूनही गुलदस्त्यात, मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

Watermelon Death Cae: 4 जणांच्या मृत्यूचं कारण अजूनही गुलदस्त्यात, मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

Jagran Marathi 1 week ago

मुंबई. watermelon death case Mumbai: मुंबईतील पायधुनी परिसरात कथित अन्न विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले आहे.

ही घटना 25 एप्रिलच्या रात्री घडली. पायधुनी परिसरातील अब्दुल्ला दोकाफिया यांच्या कुटुंबाने बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर उपचारांदरम्यान कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तसेच संपूर्ण राज्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत "कलिंगडामुळे विषबाधा कशी होऊ शकते?" अशी विचारणा केली. यावर काही मंत्र्यांनीही शंका व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना संबोधित करत स्पष्ट केले की, "हा प्रकार केवळ कलिंगडामुळेच झाला आहे का, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही." त्यांनी सांगितले की, अन्न नमुने, वैद्यकीय अहवाल आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.

या प्रकरणात अन्न सुरक्षा विभाग, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे तपास करत आहेत. संबंधित अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, विषबाधेचे नेमके कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये अन्नसुरक्षेबाबत चिंता वाढली असून, प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तपास अहवालानंतरच मृत्यूमागील खरी कारणे स्पष्ट होणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi