Dailyhunt
बळीराजासाठी गूड न्यूज! महाराष्ट्रात यंदा मान्सूनचं वेळेआधीच आगमन, या तारखेला धकडणार?

बळीराजासाठी गूड न्यूज! महाराष्ट्रात यंदा मान्सूनचं वेळेआधीच आगमन, या तारखेला धकडणार?

ळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक स्तरावर 'एल-निनो'च्या वाढत्या प्रभावामुळे यंदा मान्सूनवर संकट येईल, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदा महाराष्ट्रात मान्सून वेळेवरच नव्हे, तर काही दिवस आधीच दाखल होईल, असा महत्त्वपूर्ण दावा केला आहे.

हिंदी महासागर ठरणार ‘गेम चेंजर’
प्रशांत महासागरात जरी ‘एल निनो’ची परिस्थिती निर्माण झाली असली, तरी भारतीय मान्सूनसाठी हिंदी महासागरातील तापमान स्थिती अधिक महत्त्वाची असते. डॉ. साबळे यांच्या मते, सध्या हिंदी महासागरातील स्थिती सकारात्मक दिशेकडे झुकलेली आहे. यामुळे ‘एल निनो’चा प्रतिकूल परिणाम कमी होईल आणि पाऊस समाधानकारक राहील.

या तारखेला महाराष्ट्रात आगमन?
डॉ. साबळे यांनी राज्यातील मान्सूनचा अंदाज मांडण्यासाठी स्वतंत्र मॉडेल विकसित केले असून, या विषयावर अमेरिकेतील पाच विद्यापीठात त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, (इंडियन ओशिन डायपाेल) डायपोलनुसार ही स्थिती सकारात्मक असल्याने अंदमानमध्ये मान्सून तीन दिवस आधी पोहोचेल, केरळमध्ये दोन ते तीन दिवस आधी आगमन होईल, तर गोवा व महाराष्ट्रातही सुमारे दोन दिवस आधी, म्हणजेच २ ते ३ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. एकूणच, एल निनोची परिस्थिती असली तरी हिंदी महासागरातील अनुकूल बदलांमुळे यंदाचा मान्सून समाधानकारक राहील, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

‘एल निनो’ म्हणजे काय?

विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा सामान्यपेक्षा ०.५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते, तेव्हा त्याला ‘एल निनो’ स्थिती म्हणतात. यामुळे सहसा तापमानात वाढ आणि पावसात घट होते. मात्र, यंदा हिंदी महासागरातील अनुकूल बदलांमुळे ही भीती दूर होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live