Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धरणगावात भाजपची कार्यकारिणी बैठक संपन्न

धरणगावात भाजपची कार्यकारिणी बैठक संपन्न

रकारच्या विकासाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा; मंत्री महाजनांचे कार्यकर्त्यांना आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतीय जनता पार्टी, जळगाव पश्चिम जिल्ह्याची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक नुकतीच धरणगाव येथे पार पडली.मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशासह महाराष्ट्र वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सरकारच्या योजना आणि विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. आगामी काळात संघटना अधिक बळकट करून जनतेशी असलेले नाते दृढ करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून विरोधकांकडून केला जाणारा खोटा प्रचार हाणून पाडला पाहिजे. त्याचबरोबर नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. पक्ष आणि नेते कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि यापुढेही राहतील, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी यावेळी दिली.

तीन राजकीय प्रस्ताव एकमताने मंजूर

बैठकीत तीन महत्त्वाचे प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले. 'युवाशक्ती, संधी व विकसित भारताचा संकल्प' हा अभिनंदन प्रस्ताव जिल्हा महामंत्री कपिल पाटील यांनी मांडला. त्याला मधुभाऊ काटे आणि कृतिकाताई आफरे यांनी अनुमोदन दिले.

'विकसित महाराष्ट्रासाठी साथ द्या' हा राजकीय प्रस्ताव पोपट तात्या भोळे यांनी मांडला. या प्रस्तावाला जिल्हा प्रभारी प्रदीप पेशकर आणि ज्ञानेश्वर महाराज पाटील यांनी अनुमोदन दिले. तिसरा प्रस्ताव 'अपप्रचाराला विकासगाथा कथनाने उत्तर द्या' हा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मांडला. या प्रस्तावाला एरंडोलचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर आणि अॅड. व्ही. आर. पाटील यांनी अनुमोदन दिले.

बैठकीत SIR संदर्भात गोपाळ भंगाळे यांनी, तर 'सेवा संकल्प अभियान'ाबाबत एस. आर. पाटील यांनी निवेदन केले. पक्षाच्या आगामी उपक्रमांसह संघटनात्मक कामकाजाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भाजपा सरकारने मागासवर्गीय समाजाला न्याय आणि संधी देणारी अनेक धोरणे व योजना राबविल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित पंचतीर्थांच्या विकासासाठीही सरकारने भक्कम पावले उचलली असल्याचे त्यांनी नमूद केले.आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये विजयाचे समीकरण जुळविण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन केले. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठीही कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या विकासकामांची माहिती बूथ स्तरापर्यंत पोहोचवा; डॉ. राधेश्याम चौधरी

जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी श्रीराम मंदिर दान चोरी प्रकरणातील तथ्ये जनतेसमोर मांडून ट्रस्टची विश्वासार्हता स्पष्ट करण्याचे आवाहन केले. तसेच २०१४ ते २०२६ या कालावधीत मोदी सरकारच्या माध्यमातून देशात आणि सर्वसामान्यांच्या जीवनात झालेला बदल जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारच्या विकासकामांची आणि उपलब्धींची माहिती केवळ मोठ्या सभांपुरती मर्यादित न ठेवता बूथ स्तरापर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यांची होती उपस्थिती?

या बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार नंदकिशोर महाजन, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, माजी आमदार महेंद्रसिंग बापू पाटील, किशोर काळकर, रोहित निकम, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, जिल्हा मोर्चा, आघाडी व प्रकोष्ठांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे स्वागतपर भाषण मंडळाध्यक्ष दिनेश पाटील यांनी केले. प्रास्ताविक महामंत्री अमोल नाना पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन अॅड. युवराज रायपूरकर यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live