Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धुळे-पारोळा महामार्गावर भीषण अपघात! केमिकल टँकर कंटेनरवर धडकल्याने लागली आग; दोघांचा होरपळून मृत्यू

धुळे-पारोळा महामार्गावर भीषण अपघात! केमिकल टँकर कंटेनरवर धडकल्याने लागली आग; दोघांचा होरपळून मृत्यू

ळगाव लाईव्ह न्यूज । धुळे-पारोळा महामार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसरात रविवारी पहाटे केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील टँकरने समोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानंतर टँकरच्या टायरला आग लागली.

या भीषण दुर्घटनेत टँकरमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जीजे-१८ बीव्ही-८३१५ क्रमांकाचा केमिकल टँकर धुळ्याकडून पारोळ्याकडे जात होता. सबगव्हाण टोलनाका परिसरात पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की टँकरच्या टायरने पेट घेतला आणि काही क्षणांतच वाहनाला आग लागली.

घटनेची माहिती मिळताच पारोळा अग्निशमन दल, पोलीस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत टँकरमधील दोघांचा मृत्यू झाला होता.

अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून धुळे-पारोळा महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमध्ये टोल्युइन डायआइसोसायनेट (TDI) हे औद्योगिक वापरासाठीचे रसायन असल्याची माहिती मिळाली आहे. हे रसायन प्रामुख्याने पॉलीयुरेथेन फोम, कोटिंग्ज, ॲडेसिव्ह्ज आणि इलास्टोमर्सच्या निर्मितीसाठी वापरले जाते. सुदैवाने टँकरमधील रसायनाची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याची माहिती समोर आलेली नसून, संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live