Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

ळगाव लाईव्ह न्यूज । हृदयविकाराचा त्रास असलेल्या २२ वर्षीय गर्भवती महिलेची अतिजोखमीची प्रसूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. स्त्रीरोग तज्ज्ञ, हृदयविकार तज्ज्ञ, मेडिसीन विभाग तसेच बालरोग तज्ज्ञ यांच्या समन्वयातून आई आणि बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

या यशस्वी उपचारामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

याबाबत माहिती अशी की, वरणगाव येथील निकीता नामक २२ वर्षीय महिला दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रसूतीसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र तिला यापूर्वीपासूनच हृदयविकाराचा गंभीर त्रास असल्याने तिची प्रसूती अतिजोखमीची मानली जात होती. गर्भधारणेदरम्यान हृदयावर अतिरिक्त ताण येत असल्याने आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे रुग्णालयातील स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी तिची तपासणी केली. तसेच विशेष दक्षता घेत तातडीने हृदयविकार तज्ज्ञ आणि मेडिसीन तज्ज्ञांचा अभिप्राय घेतला.

तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलेची विविध तपासण्या करून तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रसूतीदरम्यान हृदयाची गती, रक्तदाब आणि ऑक्सिजनचे प्रमाण सतत तपासण्यात आले. अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. संस्कृती भिरूड, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे या टीमने ही अतिजोखमीची प्रसूती सुरक्षितपणे पार पडली. प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती लक्षात घेता तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली तिच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले. नवजात शिशुलाही आवश्यक उपचार आणि निरीक्षणासाठी बालरोग विभागात दाखल करण्यात आले. सध्या आई आणि बाळाची प्रकृती समाधानकारक आहे.

हृदयविकार असलेल्या गर्भवती महिलांची प्रसूती ही नेहमीच मोठे आव्हान असते. अशा रुग्णांमध्ये प्रसूतीदरम्यान हृदयावर ताण वाढण्याचा धोका असतो. मात्र सर्व विभागांच्या समन्वयातून आणि योग्य नियोजनामुळे ही प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. वेळेवर उपचार आणि सतत निरीक्षण यामुळे आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित ठेवणे शक्य झाले.

  • डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live