जळगाव लाईव्ह न्यूज | २१ मे २०२६ । राज्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून सर्वत्र उष्णतेचा कहर पाहायला मिळत असून विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्य जणू आग ओकत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने (IMD) थेट उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केला आहे.
मात्र, दुसरीकडे जळगाव जिल्हावासीयांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
जळगावात २४ तासांत तापमानात घट
गेल्या काही दिवसांच्या प्रचंड काहिलीनंतर गेल्या २४ तासांत जळगावच्या तापमानात घट नोंदवली गेली आहे. मंगळवारी जळगावचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर होता, तो बुधवारी घसरून ४२.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला.
केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या तापमानातही सुमारे १ अंशाची घसरण झाली असून रात्रीचे तापमान २६.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागच्या दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून यामुळे तापमानात घसरण झालीय. २५ मे नंतर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जळगावात दिलासा असला तरी विदर्भातील स्थिती चिंताजनक आहे. हवामान विभागाने अमरावती, वर्धा आणि अकोला या तीन जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. काल राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अमरावती येथे झाली, जिथे पारा थेट ४६.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.
उष्णतेची ही भीषण लाट आणि उष्माघाताचा धोका पाहता प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडू नये, तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

