जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या आणि पर्यटनासाठी निघणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.
पुणे आणि नागपूर दरम्यान ‘वीकेंड स्पेशल’ गाड्यांच्या दोन फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे ही गाडी जळगाव आणि भुसावळमार्गे धावणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१४६७ पुणे - नागपूर स्पेशल शुक्रवार (०१.०५.२०२६) रोजी पुण्याहून १५:५० वाजता (०१ फेरी) सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता जळगावला तर भुसावळला रात्री १२.१५ मिनिटाने पोहोचेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ०८:०५ वाजता नागपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४६८ नागपूर - पुणे स्पेशल रविवार (०३.०५.२०२६ ) रोजी नागपूरहून ०७:०० वाजता (०१ फेरी) सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.२०वाजता भुसावळला, तर ३.५२ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल. यानंतर त्याच दिवशी रात्री २३:३० वाजता पुण्याला पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा?
या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर (अहमदनगर), बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा. १ एसी २-टियर, १ एसी ३-टियर, १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल सेकंड क्लास आणि ०२ गार्ड/लगेज व्हॅन (एकूण २० आयसीएफ डबे) असतील.
या गाड्यांमुळे जळगाव आणि भुसावळमार्गे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची प्रवासाची सोय अधिक सुकर होणार आहे. प्रवाशांनी या विशेष फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

