Dailyhunt
नातेवाईकांवर विश्वास ठेवला अन् लाखोंचा फटका बसला!

नातेवाईकांवर विश्वास ठेवला अन् लाखोंचा फटका बसला!

ळगाव लाईव्ह न्यूज । नोकरीचे आमिष देऊन अनेकांना गंडविले जात असल्याचे प्रकार वाढताना दिसत असून असाच एक प्रकार जळगावतूण समोर समोर आला आहे. नाशिक येथील नोट प्रेसमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एवढेच नव्हे, तर पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, फसवणूक करणाऱ्याच्या पत्नीनेच पाहुणी म्हणून राहात असताना ९७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिव कॉलनीतील दीपिका संदीप पाटील (वय ३९) यांना त्यांच्या मावशीच्या चुलत जावई हर्षल संजय वाघ (रा. लोहगाव, ता. शिंदखेडा, जि. धुळे) याने २०२२ साली नाशिक येथील नोट प्रेसमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी दीपिका यांनी हर्षलला तब्बल १४ लाख रुपये दिले. मात्र दोन वर्षे उलटूनही नोकरी न लागल्याने त्यांनी पैशांची मागणी सुरू केली.

४ एप्रिल रोजी दीपिका पाटील या त्यांच्या मावशीसोबत लोहगाव येथे हर्षलच्या घरी गेल्या. त्या वेळी हर्षल घरी नसल्याने त्याच्या वडिलांनी २ लाख रुपयांचा धनादेश दिला. दरम्यान, हर्षलने फोनवरून त्याची पत्नी अश्विनी हर्षल वाघ हिला दीपिका पाटील यांच्यासोबत जळगावला जाण्यास सांगितले आणि दोन दिवसांत उर्वरित रक्कम देण्याचे आश्वासन दिले. नातेवाईक असल्याने दीपिका यांनी अश्विनीला स्वतःच्या घरी राहण्यास आणले.

दरम्यान, ४ ते ६ एप्रिल दरम्यान अश्विनी ही त्यांच्या घरी पाहुणी म्हणून राहिली. ६ एप्रिल रोजी दुपारी दीपिका पाटील या थेरपीसाठी बाहेर गेल्या असताना त्यांनी अंगावरील दागिने काढून घरातील हॉलमध्ये ठेवले होते. सायंकाळी त्या घरी परतल्या असता अश्विनी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याचे आढळले. तसेच हॉलमध्ये ठेवलेले ९७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिनेही गायब असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेनंतर दीपिका पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, अश्विनी हर्षल वाघ हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live