जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या सुरात रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे काही महत्त्वाच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
यामध्ये जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या अप/डाऊन सुरत-अमरावती एक्स्प्रेसचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 20925 सुरत-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस ही 2 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान सुरतऐवजी उधना स्थानकावरूनच सुटणार आहे. तसेच गाडी क्रमांक 20926 अमरावती-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस ही 30 मार्च ते 27 एप्रिल 2026 या कालावधीत सुरतपर्यंत न जाता उधना येथेच प्रवास समाप्त करणार आहे.
यामुळे खान्देश आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुरतऐवजी उधना येथून गाडी पकडावी लागेल. विशेषतः अमरावती, अकोला, भुसावळ, जळगाव, अमळनेर, दोंडाईचा आणि नंदुरबार या भागातील प्रवाशांसाठी ही गाडी महत्त्वाची असल्याने प्रवाशांना वेळेआधी नियोजन करावे लागणार आहे.
दरम्यान, सुरत स्थानकावर सध्या ट्रॅक दुरुस्ती, यार्ड रिमॉडेलिंग, सिग्नलिंग सुधारणा आणि प्लॅटफॉर्म विस्ताराची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. प्रवासी सुविधा वाढवणे, गाड्यांची हालचाल अधिक सुरक्षित आणि वेगवान करणे तसेच भविष्यातील वाढत्या रेल्वे वाहतुकीची गरज लक्षात घेऊन ही कामे हाती घेण्यात आली आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

