Friday, 30 Mar, 5.10 am जनशक्ति

होम
मराठी कलाकारांचा सन्मान झाला तरच भाषा समृद्ध होईल!

दैनिक जनशक्तिला सदिच्छा भेटीप्रसंगी संगीतकार हर्षित अभिराज यांचे प्रतिपादन
'बबन' चित्रपटाद्वारे नव्वदच्या दशकातील मेलोडी परत आणण्याचा प्रयत्न केला

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न होत आहे. ही आनंदाची बाब आहे; परंतु मराठी कलाकारांचा सन्मान ठेवला तरच भाषा आणखी समृद्ध होईल, असे प्रतिपादन 'बबन' चित्रपटाचे संगीतकार तसेच मराठीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हर्षित अभिराज यांनी केले. शुक्रवारी अभिराज यांनी दैनिक जनशक्तिच्या पुणे आवृत्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. बबन चित्रपटातील गाणी कमालीची लोकप्रिय झाली असून, पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने पाच कोटीचा गल्ला जमविला आहे. त्यातील गाणी ही हर्षित यांनी संगीतबद्ध केली असून, ती लोकप्रिय ठरली आहेत. या गाण्यांद्वारे नव्वदच्या दशकातील मेलोडी परत आणण्याचा प्रयत्न केला आहे. रसिकांना संगितातील विविधता भावते, पुन्हा एकवेळ कर्णमधूर संगिताला चांगले दिवस येतील, असा आशावादही हर्षित यांनी व्यक्त केला.

'बबन' 500 चित्रपटगृहांत झळकला,
पहिल्याच आठवड्यात 5 कोटींचा गल्ला!
हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेला आणि भाऊसाहेब कर्‍हाडे यांनी दिग्दर्शित केलेला बबन हा चित्रपट 23 मार्चपासून प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने पाच कोटी रुपयांचा गल्ला जमविला असून, राज्यातील 500 चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला हर्षित अभिराज यांचे संगीत दिग्दर्शन लाभले असून, गाणीही त्यांनी संगीतबद्ध केली आहे. शुक्रवारी त्यांनी दैनिक जनशक्तिच्या पुणे आवृत्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनी त्यांचे स्वागत केले. जाहिरात व्यवस्थापक केशव शेटे यांच्यासह वरिष्ठ उपसंपादक भक्ति शानभाग, उपसंपादक प्रदीप माळी, सोनिया नागरे, स्वाती आरगडे, विशाल भिंगारदिवे, आदेश टिबे, दर्शन कोळेकर, रिंकेश जैन, गजानन कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हर्षित अभिराज म्हणाले, की बबन या चित्रपटात विनायक पवार यांच्या शब्दरचनेवर श्रावण महिना या गाण्यात सुमधुर मेलोडीत रचली गेली आहे. इसराज हे तंतूवाद्य वापरून गाण्याला एक वेगळा ढंग देण्याचा प्रयत्न झाला. तसेच, जगण्याला पंख फुटले या गाण्यात तंतूवाद्य, बासरी व विंड प्रकारातील वाद्याची तालबद्ध सांगड घातली. यात सिंथ कमी करून लिरिक्सवर भर दिला आहे. ऐंशी-नव्वदीच्या दशकात मेलोडीची रचना करणार्‍या संगीतकारांचा चित्रपटसृष्टीत मोठा पगडा होता. अलिकडे, या अभिजात रसिकतेची क्रेझ कमी झाली आहे. ती पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असेही हर्षित यांनी सांगितले.

संगीतकार, कलाकारांना राजाश्रय, लोकाश्रय मिळावा!
पायरसी आणि डिजिटलच्या विळख्यात आजचा सिनेमा अडकला आहे. नवोदित कलाकाराला मोठा संघर्ष करावा लागतो, गुणवत्ता, दर्जा आणि कला असूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षितता येते. ही परिस्थिती बदलली तर मराठी चित्रपटसृष्टीत चांगले संगीत व कलाविष्कार नक्कीच पहावयास मिळतील, असे सांगून हर्षित अभिराज यांनी सांगितले, की संगीताचा आत्मा म्हणविल्या जाणार्‍या अ‍ॅनॉलॉगचा पद्धतीचा दिवसेंदिवस वापर कमी होतो आहे. जाणकारांची उणीव या क्षेत्रात भासत आहे. पूर्वीसारख्या रियाझ बैठका आजघडीला होत नाहीत. त्यामुळे तुटपुंज्या रियाझवर या क्षेत्रात येणारे संगीतकार वाढले आहेत. त्यामुळे कॉपी-पेस्टचे प्रमाणही वाढले आहे. खरे तर रसिकांना सुखावणारे नवे पर्याय संगीतकाराने आणायला हवेत, असा सल्लाही त्यांनी दिला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे; ही अपेक्षा सरकारने नक्कीच पूर्ण करावी. परंतु, ग्रामीण भागातून येणार्‍या कलाकारांना राजाश्रय देण्याचा प्रयत्नही करावा. तामिळ, आंध्रप्रदेशात तेथील कलाकारांना, संगीतकारांना तेथील सरकार राजाश्रय देते. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवते, त्यामुळे तिकडे त्यांच्या भाषेत उत्कृष्ट कलाकृती निर्माण होत आहे. आपल्याकडे मात्र संगीतकार, कलाकारांची उपेक्षा केली जाते. प्रस्थापित संगीतकार नवोदितांना पुढे येण्यासाठी संधी देत नाहीत, अशी खंतही हर्षित यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

कोण आहेत हर्षित अभिराज?
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या 'दूरच्या रानात केळीच्या बनात' या कवितेला संगीतबद्ध करून अभिराज यांनी सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध गायक डॉ. एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निशिगंध या मराठी अल्बमला संगीत दिले. आजपर्यंत हरिहरन, कैलाश खेर, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, साधना सरगम, वैशाली सावंत, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, मुग्धा वैशंपायन यांनी अभिराज यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गायली आहेत. 15 अल्बम, बबनसह 11 मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले असून, आम्ही दोघे, दूरच्या रानात-एक सुरेल सफर, नातं तुझं माझं, रुणुझुणू वारा रिमझिम झारा या रंगमंचीय कार्यक्रमाचे सादरीकरणही त्यांनी केले आहे. मास्तर एके मास्तर, आंदोलन, अंगारकी व बबन हे त्यांनी संगीतबद्ध केलेले गाजलेले चित्रपट आहेत. बबन चित्रपटात 'श्रावण महिना' आणि 'जगण्याला पंख फुटले' ही त्यांची गाणी कमालीची लोकप्रिय ठरली आहेत. आगामी दोन महिन्यात संगीत रसिकांना त्यांच्या डोंबारी आणि हिच्यासाठी कायपण या चित्रपटात ते नव्या धाटणीची गाणी घेऊन येणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Janshakti
Top