Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

'चीन भेटीतील भाषणे' या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा

साधना ट्रस्टच्या ग. प्र. प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या अभ्यासवृत्तीतून साकारलेले पहिले पुस्तक 'चीन भेटीतील भाषणे' या नावाने वाचकांसमोर आले आहे.
रवींद्रनाथ टागोर यांनी 1924 मध्ये चीनला भेट दिली. त्या 50 दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भाषणे दिली. त्यातील सात भाषणांचे पुस्तक Talks in China या नावाने 1925 मध्ये आले. त्यापैकी पहिले भाषण आत्मकथनात्मक आहे, दुसरे आयोजकांना उद्देशून, तिसरे विद्यार्थीमित्रांना उद्देशून तर चौथे शिक्षकांना उद्देशून आहे.

पाचवे भाषण संस्कृती व प्रगती यांचा परामर्श घेणारे आहे, तर सहावे भाषण सत्य या संकल्पनेवर आधारित आहे. सातवे भाषण चीनचा निरोप घेताना दौऱ्याचा मागोवा घेणारे आहे.
त्या सर्व भाषणांचा अनुवाद, तसेच तो दौरा आयोजित करणारे लियांग छिछाव यांनी लिहिलेला लेख, दौऱ्याची एकूण आखणी आणि रूपरेषा, या भेटीला चीनमध्ये झालेला विरोध आणि मिळालेला पाठिंबा, चीनमधल्या वृत्तपत्रांतली आणि बुद्धिजीवी वर्तुळातली चर्चा, दौऱ्याच्या वेळी झालेले वादसंवाद आणि त्या दौऱ्याचे इतर तपशील आणि आशयाला पूरक अशी छायाचित्रे यांचा समावेश या संदर्भसमृद्ध पुस्तकात आहे.मूळची पुण्याची असलेली आणि सध्या चीनमध्ये अनुवादशास्त्राचा अभ्यास करत असलेली युवती सानिया कर्णिक हिने हे सर्व अनुवाद इंग्रजी आणि चीनी भाषेतून केलेले आहेत. साधना प्रकाशनातर्फे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला. पुस्तकाचे प्रकाशन 'चिनी महासत्तेचा उदय' या पुस्तकाचे लेखक सतीश बागल यांच्या हस्ते झाले.

जर्मन भाषेच्या अभ्यासक नीती बडवे या प्रमुख अतिथी होत्या, तर 'अंतर्नाद'चे माजी संपादक भानू काळे अध्यक्षस्थानी होते. या तिघांप्रमाणेच प्रकाशक आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाठ , तसेच अनुवादक-संपादक सानिया कर्णिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रविवार, 19 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन हॉल, नवी पेठ, पुणे येथे हा सोहळा संपन्न झाला. त्या सोहळ्याचा हा 2 तासांचा व्हिडिओ आहे.
रबीन्द्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोरसानिया कर्णिकभाषणभाषांतर अनुवादअनुवादित पुस्तकसाधना प्रकाशनसाधना प्रकाशनचे नवे पुस्तकचीनचीन राजकारणचीन इतिहास टागोरभाषानीती बडवेभानू काळेसतीश बागल
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kartavya Sadhana