गृहिणीच्या भूमिकेला जोडून, किंवा त्या भूमिकेतून बाहेर पडून इतर अनेक भूमिका लीलया पेलणारी स्त्री महाराष्ट्राने किमान शतकभर अनुभवलेली आहे. आणि म्हणूनच कर्तृत्ववान स्त्रीकडे किंवा स्त्रीने मिळवलेल्या यशाकडे स्वतंत्रपणे बघण्याचा दृष्टीकोन, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या पुरुषांमध्ये, बऱ्यापैकी विकसित होतो आहे असं म्हणायला वाव आहे.
राजकीय आणि सामाजिक संघर्षांचं चित्रण करणाऱ्या फोटोग्राफर-पत्रकार पौलोमी बसू यांचं काम विशेष आहे. नेपाळमध्ये द्रौपदी / छौपदी नावाची प्रथा होती. हिंदू स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात आणि प्रसूतीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या काळात घरातून हाकलून दिलं जात असे आणि बाहेर झोपडीत राहावं लागत असे. पौलोमीने 'ब्लड स्पीक्स : अ रिचुअल ऑफ एक्झाईल' या फोटोमालिकेच्या माध्यमातून या अन्यायाला वाचा फोडली. त्याची दखल घेऊन 2018 मध्ये नेपाळ सरकारने कायदा करून ही प्रथा बंद केली. भारत सरकार आणि माओवादी पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी यांच्यातील संघर्षाबद्दलचं 'सेंट्रलिया' नावाचं त्यांचं फोटोबुक आहे. 'टू काँकर हर लँड' या फोटोमालिकेत त्यांनी भारत-पाकिस्तान सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैन्यातल्या पहिल्या महिला सैनिकांचं चित्रण केलं आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय प्रश्न, निसर्ग, पर्यावरण, स्त्रीवाद यांच्याशी संबंधित सामाजिक फोटोग्राफी हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे.काश्मीरमध्ये महिला छायाचित्रकारांची एक नवीन पिढीच उदयाला येते आहे. लग्नाच्या फोटोग्राफीच्या व्यवसायात स्त्रिया एक नवा दृष्टीकोन घेऊन काम करत आहेत. त्या केवळ प्रसंग टिपत नाहीत, तर काश्मीरचे सांस्कृतिक बारकावे, परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालत आहेत. पारंपरिक लैंगिक भूमिकांना आव्हान देत आहेत. साहिबा वानी ही तरुणी या चळवळीची प्रणेती आहे.झोया थॉमस लोबो हिचा जन्म मुलगा म्हणून झाला असला तरी तिची ओळख पारलिंगी व्यक्ती म्हणून झाली आहे. फोटोग्राफीच्या माध्यमातून ती समाजातल्या दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त लोकांचे प्रश्न मांडते आहे. अर्थातच त्यात पारलिंगी समूह केंद्रस्थानी असतो.स्त्रियांवर कठोर नियंत्रण ठेवून त्यांचं नियमन करण्याचा हट्टीपणा इराणमधले राज्यकर्ते करत आहेत. नवऱ्याच्या परवानगीशिवाय नोकरी करणाऱ्या किंवा सार्वजनिक जीवनात वावर असणाऱ्या स्त्रियांवर बंधनं लादण्यात आली. फरो अलाई या फोटोग्राफर महिलेने आपापल्या परीने आवाज उठवणाऱ्या आणि निर्भयपणे जगणाऱ्या स्त्रियांचे फोटो प्रसिद्ध करायला सुरुवात केली. मुष्टियोद्ध्या, गिर्यारोहक, नृत्यांगना, कार मेकॅनिक, चित्रकार, आईस हॉकी खेळाडू, स्टंटवूमन अशा 'रोल मॉडेल' महिलांचा यात समावेश आहे.फॅशन फोटोग्राफर साक्षी साळी-पाटील, वाईल्डलाईफ फोटोग्राफी करणारी सोनाली जोशी, स्वतःच्या आणि आजूबाजूच्या जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी म्हणून फोटोग्राफीकडे बघणारी शीतल मल्लार, आपल्या फोटोग्राफीतून पर्यावरणीय प्रश्नांकडे लक्ष वेधणारी पद्मावती वेल्हाळ, फॅशन, वेडिंग, मॅटर्निटी, नवजात बालकं आणि लहान मुलांची फोटोग्राफी, समारंभ, जाहीर कार्यक्रम, जाहिराती, फूड फोटोग्राफी, वाईल्डलाईफ फोटोग्राफी आणि पर्यावरणविषयक फोटोग्राफी अशा क्षेत्रांत मुक्त संचार करणाऱ्या प्रणाली-चैताली या देवळाणकर भगिनी, अशीच वेगवेगळी कामं करून शिवाय फोटोग्राफीचं प्रशिक्षण देणारी प्रतिभा औंधकर, वर्तमानपत्रांसाठी आवश्यक असणारे समारंभांचे आणि व्यक्तींचे, नामवंत व्यक्तींचे फोटो काढणारी सीमा जोशी, शोधपत्रकारिता आणि अपघातांचं दस्तऐवजीकरण यासाठी फोटो काढणारी गांधीवादी विचारांची संगीता महाजन - या आणि पुस्तकात ज्यांची माहिती आहे त्या सर्वच फोटोग्राफर्सचं काम उल्लेखनीय आहे.या सर्वांशी झालेल्या संवादात फोटोग्राफीविषयीचे काही समान मुद्दे अधोरेखित होतात. फोटोग्राफर ही एक कलाकार असते. काय बघायचं आणि ते कसं टिपायचं याची दृष्टी तिच्याकडे असावी लागते. आपल्याला जे भावतं, जे नजरेला दिसतं ते कॅमेऱ्यात टिपण्याची (पॉईंट अँड शूट) सवय लावून घेतली पाहिजे. ते टिपण्यासाठी चांगला कॅमेरा, लेन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक प्रशिक्षण यांचा उपयोग निश्चित होतो. मात्र "Camera doesn't take pictures, photographers do" हे सूत्र कायम लक्षात ठेवलं पाहिजे.आजकाल मोबाईल फोनमध्ये उत्तम कॅमेरे असतात. पण तरीही ज्या व्यक्तीकडे लाईट सेन्स आणि व्ह्यूफाइंडरमधल्या कंपोझिशनच्या चौकोनाची आणि लेन्सची दृष्टी आहे, ती व्यक्ती मोबाईल फोटोग्राफीच्या नक्कीच दहा पावलं पुढे असणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या हातात फोन असला तरी व्यावसायिक फोटोग्राफर्सची मागणी वाढतेच आहे. फोटोग्राफरकडे सर्जनशीलता आणि कलात्मकता असणं आवश्यक आहे.विशिष्ट सामाजिक भान किंवा दृष्टीकोन बाळगून छायाचित्रण करणाऱ्या महिलांची विशेष नोंद घेतली जाते, घेतली जायलाही हवी. ते काम महत्त्वाचं आहेच. पण फॅशन फोटोग्राफी, मॉडेल फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी ह्यादेखील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण फॅशन हे एक स्वतंत्र कार्यक्षेत्र आहे आणि आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगांची आठवण देखण्या स्वरूपात लोकांना हवी असते, हे सत्य आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या फोटोग्राफीला एक स्वतंत्र आणि महत्त्वाचं स्थान आहे. ही बाबदेखील या लेखांतून स्पष्टपणे पुढे येते. प्रवीण घोडेस्वार यांनी त्या त्या फोटोग्राफरचं बलस्थान, तिचे विचार, तिची पार्श्वभूमी, तिचं प्रशिक्षण, तिची दृष्टी आणि तिचा दृष्टीकोन यांचा सांगोपांग विचार करून नेमकेपणाने आणि नेटकेपणाने मांडणी केली आहे.या क्षेत्रात महिलांचं प्रमाण कमी असण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महिलांवर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, असं यातल्या बहुतेक सर्व फोटोग्राफर्सना वाटतं. स्त्रियांनी घरासाठी, कुटुंबासाठी किती वेळ दिला पाहिजे, घराबाहेर किती आणि कोणता वेळ घालवला तर चालेल, कोणत्या वेळी त्यांनी बाहेर असताच कामा नये, कोणत्या वेळेपर्यंत त्यांनी बाहेरून घरी आलेलं असलंच पाहिजे, अशा बाबतीत समाजाने स्त्रियांवर घातलेली बंधनं खूप आहेत. बरीचशी बंधनं स्त्रियांनी स्वीकारलेलीही आहेत.फोटोग्राफीचं कौशल्य आत्मसात करणं फारसं अवघड नसतं. मात्र ते आत्मसात केल्यानंतर त्याचा व्यवसाय म्हणून विचार करताना फोटोग्राफरला प्रचंड वेळ द्यावा लागतो. आणि आपल्या समाजामध्ये स्त्रीला तेवढा वेळ तिच्या कामावर किंवा कलेवर गुंतवण्याची परवानगी नसते. हा एक समान धागा या सर्व संवादांमधून आपल्याला दिसतो.पुस्तकात फोटोग्राफीबरोबर व्हिडिओग्राफीदेखील करणाऱ्या काही महिलांचा उल्लेख आहे. पण विशेषतः व्हिडिओग्राफी करणाऱ्या महिलांना मात्र स्थान दिसत नाही. कदाचित तो वेगळ्या पुस्तकाचा विषय ठरू शकेल. या क्षेत्रात महिलांसाठी काय विशेष संधी आहेत किंवा काय विशिष्ट मर्यादा आहेत, या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बरीच पुनरावृत्ती दिसते. आणि दोन-तीन लेख वाचून झाल्यावर पुढचे लेख वाचताना आता पुढे काय मुद्दा आहे आणि तो कोणत्या शब्दांत येणार आहे, याचा अंदाज येऊ लागतो. समाजातलं वास्तव, संवादाची रूपरेषा, बोलण्यातले मुद्दे आणि लेखकाची शैली ह्या गोष्टी सर्व लेखांत सामायिक असल्यामुळे ही पुनरावृत्ती जाणवते, हे जरी खरं असलं लेखाची मांडणी करताना त्यात अभिव्यक्तीचं थोडं वैविध्य आणलं असतं तर जास्त योग्य झालं असतं.दैनिक नवशक्तीने हा विषय त्यांच्या पुरवणीतून हाताळला, याबद्दल नवशक्तीच्या तत्कालीन फीचर एडिटर संध्या नरे-पवार, उपसंपादक क्रांती गोडबोले-पाटील आणि संपादक प्रकाश सावंत यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. आणि याला पुस्तकाचं रूप देताना केलेले काही बदल, त्या त्या कलाकारांनी काढलेल्या छायाचित्रांची पानं, गौरीश सोनार यांचं उत्तम मुखपृष्ठ आणि जुळणी यांचाही उल्लेख आवर्जून करायला हवा.पुस्तक अवश्य वाचनीय आणि संग्राह्य तर आहेच; शिवाय या क्षेत्रातल्या महिलांची माहिती मिळवायची असेल, तर ते आपलं कुतूहलही जागं करणारंही आहे.- ऋचा मुळेkartavyasadhana@gmail.comशीर्षक : 'कॅमेऱ्यामागची ती'
लेखक: डॉ. प्रवीण घोडेस्वार
प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठसंख्या : 128 + 50 फोटोची पाने
किंमत : रु. 350फोटोग्राफीफोटोग्राफर महिला फोटोग्राफरस्त्री फोटोग्राफरहोमी व्यरावालापौलोमी बसू

