Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुर्वेंची कविता म्हणजे कवितारूप आत्मचरित्रच

सुर्वेंची कविता म्हणजे कवितारूप आत्मचरित्रच

नारायण सुर्वे यांच्या कवितेला नवे आत्मभान आणि नवे समाजभान होते. थोरांमोठ्यांचे लक्ष तिने वेधून घेतले. ही कविता समकालीन दलित कवितेच्या अंतःस्वराशी नाते सांगणारी होती; पण ती पूर्णतः दलित कवितेच्या संवेदनशीलतेची नव्हती.
जीवनाचे नवे आयाम, नवी परिभाषा आणि नव्या प्रतिमा यांचा आविष्कार तिच्यात होता. शोषितांच्या अंतर्विश्वाचे चित्रण तिच्यात होते. हे युगभान वेगळे होते. हा एका वेगळ्या भावविश्वाचा आणि त्यातील दुःखाचा आदिस्वर होता.स्वातंत्र्योत्तर कालखंडात जीवनप्रवाहातील वास्तवाने नवे रूप धारण केले. स्वातंत्र्य ही माणसाच्या जीवनातील मूलभूत प्रेरणा होय. त्यामुळे त्याच्या जीवनाची गती बदलते. उन्नयनाचा नवा मार्ग त्याला दिसू लागतो. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचे जनजीवन ढवळून निघाले. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर सामान्यांतील सामान्य माणसालादेखील आपले भवितव्य घडविण्याची नवीन सनद प्राप्त झाली. परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. अर्थातच स्वातंत्र्योत्तर कालखंडात मराठी काव्यविश्वात नवे प्रवाह आणि नव्या प्रवृत्ती आल्या. 1960 नंतरच्या काळात तर आशय आणि अभिव्यक्ती यांना नवे वळण प्राप्त झाले नवी संवेदनशीलता निर्माण झाली. हे परिवर्तन पहिल्यांदा प्रकट झाले ते कवितेसारख्या संवेदनशील आणि जीवनाचा सारांश समर्थपणे सांगणाऱ्या वाङ्‌मयप्रकारात. कवितेने कूस बदलली. कल्पनाविश्वापेक्षा वास्तव जीवनातील अनुभूती प्रकर्षाने अभिव्यक्त झाली. या काळाचे प्रमुख वैशिष्ट्य हे की, पूर्वी अधःस्तरावरील माणसाचे जीवन मूक होते. नंतरच्या काळात प्रखर आत्मस्वर मुखरित झाला. या पार्श्वभूमीवर नारायण सुर्वे यांच्यासारख्या अभावग्रस्ततेतून आलेल्या कवीची कविता उद‌यास आली. या कवितेला नवे आत्मभान आणि नवे समाजभान होते. थोरांमोठ्यांचे लक्ष तिने वेधून घेतले. ही कविता समकालीन दलित कवितेच्या अंतःस्वराशी नाते सांगणारी होती; पण ती पूर्णतः दलित कवितेच्या संवेदनशीलतेची नव्हती. जीवनाचे नवे आयाम, नवी परिभाषा आणि नव्या प्रतिमा यांचा आविष्कार तिच्यात होता. शोषितांच्या अंतर्विश्वाचे चित्रण तिच्यात होते. हे युगभान वेगळे होते. हा एका वेगळ्या भावविश्वाचा आणि त्यातील दुःखाचा आदिस्वर होता. मुंबईसारख्या महानगरात प्रतिकूल परिस्थितीत राहून चरितार्थ चालवणाऱ्या कामगारविश्वाचे जीवन या कवीने रेखाटले. कवी नारायण सुर्वे यांनी स्वतः भोगलेल्या दुर्दैवी, कारुण्यमय जीवनाची व्यथा जनमानसासमोर मांडणारी ही कविता होती. जन्मदात्या आईनेच या मुलाचा जन्मताक्षणी त्याग केला होता. उकिरड्यावरील जीवन या मुलाच्या नशिबी आले पण मुंबईच्या इंडिया वुलन मिलमधील स्पिनिंग खात्यात साचेवाले म्हणून काम करणारे गंगाराम सुर्वे आणि कमला मिलमध्ये बाइंडिंग खात्यात काम करणाऱ्या काशीबाई या कामगार दांपत्याने या मुलाचे पालनपोषण केले."दैवायत्तं कुले जन्मः मदायत्तं तु पौरुषम्।" या वचनाप्रमाणे या मुलाचे पुढील जीवन मात्र कर्तृत्वाच्या तेजाने उजळून निघाले. एक नवा आदित्य जन्मास आला. मराठी काव्यजगताने या कवीच्या कवितेच्या प्रखर, प्रांजळ आणि पारदर्शी अभिव्यक्तीकडे गौरवाने पाहिले. नारायण सुर्वे यांचे भागधेयच बदलून गेले.नारायण सुर्वे यांच्या कवितेतील आशय आणि अभिव्यक्ती त्यांच्या भावजीवनापासून वेगळी करता येत नाही. ती त्यांच्या व्यक्तित्वापासून अभिन्न आहे. सुरुवातीला जगरहाटीप्रमाणे त्यांच्याही कवितेची हेटाळणी झाली असेल. पण उदारहृदयी कवींनी आणि समीक्षकांनी तिची महत्ता ओळखली. मराठी काव्यरसिकांनी ती उचलून धरली.  नारायण सुर्वे अल्पशिक्षित होते. एका शाळेत त्यांना चपराश्याचे काम करावे लागले. खडतर काव्यसाधनेतून लाभलेल्या उज्ज्वल जीवनपटावर त्यांनी आपली मुळाक्षरं उमटविली. विद्वज्जनांमध्ये कधीच त्यांना हिंपुटी व्हावे लागले नाही. 'ऐसा गा मी ब्रह्म' हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह खूप प्रसिद्ध झाला. अशा या समर्थ अभिव्यक्ती असलेल्या कवितेचे अंतरंग येथे संक्षेपाने समजून घेणे आवश्यक आहे.सुर्वे यांचे सहा स्वतंत्र कवितासंग्रह प्रकाशित झाले. ऐसा गा मी ब्रह्म, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, पुन्हा एकदा कविता, माझे विद्यापीठ आणि बंधमुक्त. ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ आणि जाहीरनामा या तीन कवितासंग्रहांतल्या निवडक कविता एकत्र करून ग्रंथालीने सनद हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे.ऐसा गा मी ब्रह्म मध्ये सुर्वे म्हणतात :
आज माझ्या कोरड्या गा शब्दांत जाग येत आहे
आणि नव्या सृजनाचे क्षितिज रुंद होत आहे.
माझे विद्यापीठ या दीर्घ कवितेत कवीने आपले भावविश्व आणि भोवतालचे जीवन यांचा विशाल पट दाखवला आहे. सुर्वे यांच्या अनुभवविश्वाचा गाभा या कवितेत अभिव्यक्त झाला आहे. 'मुंबई' ही कविताही लक्षणीय आहे. मुंबईसारख्या महानगरात सुर्वे यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. त्यांना येथे व्यापक कार्यक्षेत्रात वावरण्याची संधी मिळाली. त्यांचे कवित्व सर्वांगांनी बहरून आले. म्हणून तिच्याविषयीचा कृतज्ञताभाव या कवितेत सुर्व्यांनी व्यक्त केला आहे. शब्दाला शब्द जुळवून कविता करणारे कवी अनेक असतात; पण जीवनाच्या झोतभट्टीच्या धगीत शेकून निघाल्यानंतर कवितेचा आविष्कार करणारे सुर्वे यांच्यासारखे कवी दुर्मीळच.सुरुवातीच्या काळात सुर्वे यांनी गेय कविता लिहिल्या. त्यानंतर मात्र छंदमुक्त कविता लिहिली. आत्मभान जागृत ठेवून मानवतावादी दृष्टीकोन व्यक्त करणारी चिंतनशील कविता लिहिली. मराठी कविता लोकाभिमुख करण्याचे श्रेय बऱ्याच प्रमाणात नारायण सुर्वे यांना दिले पाहिजे.'ह्या मोसमात', 'कामगार आहे मी', 'माझी आई','बेतून दिलेले आयुष्य', 'तोवर तुला मला', 'लावणी गिरणीची 'तेव्हा एक कर', 'दोन दिवस', 'विश्वास ठेव', 'विझता विझता स्वतःला', 'सत्य', 'दबाव आणू नये- तुम्ही', 'भाकरीचा चंद्र', 'गलबलून जातो तेव्हा' - या सुर्वे यांच्या लक्षणीय कविता आहेत. या साऱ्या कवितांतून सुर्वे मुंबईच्या कामगारजीवनाशी किती समरस झाले आहेत हे दिसून येते. मुंबईच्या कामगारवस्तीची सुख-दुःखे त्यांनी जाणली; आपली मानली. तेथील माणसांचा जीवनाशी चाललेला संघर्ष त्यांनी पाहिला, स्वतः अनुभवला. त्यांची जीवनाची समज वाढली. माणसे कळत गेली. त्यांची जीवनदृष्टी प्रगल्भ झाली. कामगार चळवळीमुळे त्यांचा मार्क्सवादी विचारसरणीशी परिचय झाला. गतिमान युगातील परिवर्तनशील प्रवृत्तीशी त्यांनी स्वतःला जुळवून घेतले. आत्मशोधाची प्रक्रिया त्यांच्या अंतरंगात सुरू झाली. व्यापक अर्थाने पाहिल्यास सुर्वे यांची कविता म्हणजे त्यांनी काव्यरूपाने लिहिलेले आत्मचरित्र होय. त्यांनी आपली कविता प्रचारी होऊ दिली नाही. ती आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगते. कधी कधी आत्मसंवाद साधते. हेही वाचा : सोमनाथ कोमरपंत यांनी लिहिलेले साहित्यिकांविषयीचे सर्व परिचय लेख येथे वाचा.  नारायण सुर्वे जसे प्रभावी कवी होते तसेच ते उत्तम वक्ते होते, विचारवंत होते. आत्मशोध घेताना ते उद्‌गारतात, "माझ्यात उद्धटपणा येऊ नये याची काळजी मी सतत घेत आलेलो आहे. कारण जित‌कं समजलं, त्यापेक्षाही जीवन अधिक कठोर आहे, अधिक भीषण आहे. आणि तेच आपले नवे कलावंत, नव्या कलाकृती जन्माला घालणार आहे. त्या नव्या क्रांतिकारी कालखंडाला पुन्हा सामोरं जाताना मान उंच करण्याइतपत धैर्य माझ्यात राहिलं पाहिजे. समोरच्या वास्तवाने आणि माझ्या कवितेने तेवढं धैर्य मला नक्कीच दिलेलं आहे." प्रतिकूल परिस्थितीच्या मुशीतून घडत जाताना सुर्वे यांनी आत्मनिर्भर वृत्ती कशी टिकवून ठेवलेली आहे याचा प्रत्यय यातून येतो. आपली जीवननिष्ठा आणि काव्यनिष्ठा त्यांनी अबाधित ठेवली. 1995 मध्ये परभणी येथे भरलेल्या 68 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले.स.त्र्यं. कुल्ली यांनी केशवसुत, बा. सी. मर्ढेकर आणि नारायण सुर्वे या कवींच्या समाजाभिमुख कवित्वाची क्रमवार संगती लावून 'तीन अर्वाचीन कवी' हा समीक्षाग्रंथ लिहिला आहे. त्यात त्यांनी "नारायण सुर्वे हे तिसरे केशवसुत आहेत", असे प्रतिपादन केले आहे. कुसुमाग्रजांसारख्या उत्तुंग प्रतिभाशक्ती लाभलेल्या तपस्वी कवीने नारायण सुर्वे यांना पुत्रवत मानले. ऐसा गा मी ब्रह्म च्या प्रस्तावनेत कुसुमाग्रजांनी "नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेची स्फूर्तिस्थाने पुस्तकाच्या पुस्तकाच्या कपाटात शोधली नाहीत... सुर्वे यांची कविता नव्या आनंदवनभुवनाची कविता आहे." अशा शब्दांत त्यांच्या कवितेचा गुणगौरव केला. डॉ. वि. म. कुलकर्णींसारख्या सिद्धहस्त कवीने सुर्व्यांवर 'सत्यकथा' मासिकात त्यांचा यथार्थ गौरव करणारी 'सुर्व्या नारायणा' ही कविता लिहिली आहे.प्रा. नरहर कुरुंदकर, डॉ. सदा कऱ्हाडे आणि प्रा. दिगंबर पाध्ये यासारख्या अनेक बुद्धिनिष्ठ समीक्षकांनी सुर्वे यांच्या कवितेची चांगली दखल घेतली. कुरुंदकरांनी 'प्रतिष्ठान' मासिकात सुर्व्यांच्या कवितेचा सांगोपांग परामर्श घेणारा लेख लिहिला. त्यात ते म्हणतात, "सुर्व्यांची कविता भुकेच्या शमनार्थ भीक मागणारी कविता नाही; तर भुकेचे गाठोडे खांद्यावर वाहून नेत, तिथेही आत्म्याशी बेईमान न होता, माणुसकीची कळ जपणारी कविता आहे... सारेच उपाशी कवी नसतात; आणि सारेच कवी उपाशी नसतात. पण जो कवी असतो आणि उपाशी असतो असतो, त्याची कविता निराळी होते." सदा कऱ्हाडे लिहितात, "सुर्व्यांचा मी विचार करतो तेव्हा मला तुकारामाची आणि कबीराची आठवण होते. तुकारामाचे जीवन आणि त्याची कविता यांच्यातले नाते असे अतूट आहे. "डाली डाली मैं फिरौं, पातौं पातौं दुख" असं म्हणणाऱ्या आणि हाती विद्रोहाची मशाल घेऊन फिरणाऱ्या या कबीराला सर्वत्र दुःख, दैन्य, दारिद्र्य आणि शोषण दिसले आणि तो लोकसंघर्षात उतरला."नारायण सुर्वे यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार अनेक वेळा मिळाले. 'कराड पुरस्कार' आणि 'कबीर पुरस्कार' प्राप्त झाला. महाराष्ट्र फाऊंडेशनचा प्रतिष्ठेचा पुरस्कारही प्राप्त झाला. पण तरीही हस्तिदंती मनोऱ्यात न जाता ते सतत लोकांबरोबर वावरले. अनेक सभासंमेलनांत त्यांचा सतत वावर राहिला. स्वतःला ते कार्यकर्ता म्हणवून घेत. त्यांनी समाज आणि साहित्य यांच्यामध्ये सेतू बांधण्याचा निरंतर प्रयत्न केला. त्यांच्या कवितेतील भावनात्मकता आणि प्रेरकता हे दोन्ही गुण मनाला आनंद देणारे आहेत. त्यांची समाजसन्मुख कविता अंतर्मुख करणारी आहे. या उपाशी कवीची निराळी कविता अनुभवलीच पाहिजे.- सोमनाथ कोमरपंत
somnathpant@gmail.com
(लेखक गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)माझे विद्यापीठऐसा गा मी ब्रह्मजाहीरनामा सनदमुंबईकामगारकामगारविश्वकवितामराठी कवितादलित कविताभाकरीभाकरीचा चंद्रसारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहेकामगार कविता
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kartavya Sadhana