महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपवली असून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या परीक्षेचा निकाल उद्या, शनिवारी २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून यंदा निकालाची प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल लवकर लागत आहे. यंदा राज्यभरातील पुणे, मुंबई, नागपूर यांसह नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यामध्ये ८ लाख २० हजार २२९ मुले आणि ७ लाख १२ हजार २४० मुलींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल 'mahresult.nic.in', 'hscresult.mkcl.org' किंवा 'mahahsscboard.in' या अधिकृत संकेतस्थळांवर आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव टाकून पाहता येईल. गेल्या वर्षी राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के इतका लागला होता, त्यामुळे यंदाच्या निकालाच्या टक्केवारीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

