मध्य रेल्वेने चलत्या ट्रेनमध्ये स्वतःच्या बर्थवर दिवा लावून पूजा करणाऱ्या एका ५५ वर्षीय प्रवाशावर कायदेशीर कारवाई करत त्याला गाडीतून खाली उतरवले आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी असलेल्या या प्रवाशाविरुद्ध रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, ट्रेनच्या आत कोणतेही ज्वलनशील पदार्थ आणू नयेत तसेच दिवा, मेणबत्ती किंवा अगरबत्ती पेटवू नये, कारण अशा कृत्यांमुळे मोठा अग्नितांडव होऊन प्रवाशांच्या प्राणाला धोका निर्माण होऊ शकतो.
ही घटना ३१ ऑगस्ट रोजी हजरत निजामुद्दीन-मैसुरू एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक १२७८२) मधील कोच ए-१ मध्ये घडली. बर्थ क्रमांक १७ वर बसलेला गरीब नावाचा प्रवासी पीतलचा दिवा लावून पूजा करत असल्याचे तिकीट तपासणी कर्मचाऱ्याच्या (टीटीई) निदर्शनास आले. टीटीईने प्रवाशाला आग लागण्याच्या धोक्याची जाणीव करून देत दिवा विजवण्याची विनंती केली, परंतु प्रवाशाने पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझवण्यास नकार दिला. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग टीटीईने आपल्या मोबाईलमध्ये केले.
यानंतर मध्य रेल्वेने भुसावळ स्थानकात त्या प्रवाशाला खाली उतरवून त्याच्याकडून माचिस, पीतलचा दिवा आणि स्टीलचा डबा जप्त केला. रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १५३ आणि १४५(बी) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले. रेल्वे नियमांनुसार सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या आणि ज्वलनशील पदार्थांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना दंड तसेच ५ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

