देशाची राजधानी दिल्लीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे उत्तर-पूर्वी दिल्लीतील उस्मानपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निष्पाप बालकाचा वेदनादायक मृत्यू झाला. जग प्रवेश चंद्र रुग्णालयाजवळ 'चायनीज मांजा'च्या विळख्यात आल्याने या चिमुरड्याचा गळा कापला गेला.
हा मांजा इतका धारदार होता की त्यामुळे मुलाची मान धडावेगळी झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ वर्षांचा हा मुलगा आपल्या कुटुंबासोबत दुचाकीवरून जात असताना अचानक वाटेत आलेल्या धोकादायक मांजामुळे हा भीषण अपघात घडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. शहरात बंदी असलेला 'चायनीज मांजा' नेमका आला कुठून आणि त्याचा वापर कोण करत आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी दुकानदार आणि स्थानिक लोकांकडेही चौकशी केली जाणार आहे. या थरारक घटनेमुळे दिल्लीत पुन्हा एकदा चायनीज मांजाच्या धोक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाच्या बंदीनंतरही याची सर्रास विक्री होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

