इराणसोबत वाटाघाटीच्या चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा थेट आणि जाहीर इशारा दिला आहे. अमेरिकेने मनात आणल्यास ते केवळ एका झटक्यात इराणच्या उर्वरित संपूर्ण नेतृत्वाला संपवू शकतात, असा मोठा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. सध्या तेहरानमध्ये अली खामेनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी इराणचे अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकारी एकाच ठिकाणी गोळा झाले आहेत. ट्रम्प यांच्या वक्तव्याचा थेट रोख याच नेत्यांच्या दिशेने होता. मात्र, अमेरिकेला इराणसोबतची चर्चा थांबवायची नसल्याने सध्या अमेरिका असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'Axios' या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला. ते म्हणाले की, इराणचे सर्व प्रमुख नेते सध्या अंत्यसंस्काराच्या निमित्ताने एकाच ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही एकाच शॉटमध्ये त्या सर्वांना संपवू शकतो, पण आम्ही तसे करणार नाही कारण तसे केल्यास भविष्यात चर्चा करण्यासाठी समोर कोणीही शिल्लक राहणार नाही. या मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी अंत्यसंस्काराच्या वेळी रडणाऱ्या इराणी नागरिकांवरही निशाणा साधला. तिथल्या जनतेला खामेनींचा तिरस्कार वाटत असावा असे मला वाटत होते, त्यामुळे लोकांचे हे अश्रू कदाचित बनावट असू शकतात, असा टोला त्यांनी लगावला.
ट्रम्प यांच्या या विधानावर आर्मेनियामधील इराणच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत तीव्र आक्षेप घेतला आहे. ट्रम्प यांना या गोष्टी समजणार नाहीत, कारण त्यांच्याकडे ना संस्कृती आहे, ना इतिहास आणि ना सन्मान, अशा कडक शब्दांत इराणने ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी इराणच्या लष्करानेही अमेरिका आणि इस्रायलला गंभीर इशारा दिला होता. खटाम अल-अनबिया सेंट्रल हेडक्वार्टरचे कमांडर अली अब्दोल्लाही यांनी सांगितले की, शत्रूंनी कोणताही गैरसमज बाळगू नये, आमच्या देशाविरुद्धच्या कोणत्याही आक्रमक पाऊलाला इराणचे सशस्त्र दल अत्यंत चोख आणि कठोर प्रत्युत्तर देईल. अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची मिरवणूक शुक्रवार, ३ जुलै रोजी तेहरानमध्ये सुरू झाली असून, ९ जुलै रोजी त्यांच्या जन्मगावी म्हणजेच मशहद येथे दफनविधीने याची सांगता होणार आहे.

