मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षेची आणि कायदा-सुव्यवस्थेची कारणे देत या आंदोलनाला परवानगी नाकारली असली, तरी जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर पत्रकारांशी बोलताना या विषयावर महत्त्वपूर्ण भाष्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह असून लाखो भाविक रस्त्यावर असतात. अशा मोठ्या सणाच्या काळात मुंबईत आंदोलन करणे योग्य नाही, त्यामुळं गणेशभक्तांना त्रास होऊ शकतो. मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाचा आणि मुंबईत येण्याच्या निर्णयाचा पुनश्च विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी हा उत्सव प्रदूषणमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

