हॉर्मुज सामुद्रधुनीच्या सागरी क्षेत्रात व्यावसायिक जहाजांवर आणि खलाशांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल भारताने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सोहर अँकररेज येथे एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर दोन भारतीय खलाशी बेपत्ता झाल्याची चिंताजनक घटना समोर आली आहे.
एमटी पेट्रो डल्फिन नावाच्या जहाजावर रविवारी हा ड्रोन हल्ला झाला, ज्यामध्ये ११ भारतीय खलाशांपैकी दोघे बेपत्ता झाले आहेत. स्थानिक तटरक्षक दल आणि संबंधित प्रशासनाकडून या बेपत्ता खलाशांच्या शोध व बचावासाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे. मस्कतमधील भारतीय दूतावास ओमानच्या अधिकारी वर्गासोबत सतत संपर्कात असून जहाज व्यवस्थापन कंपन्यांच्या समन्वयाने सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे. याशिवाय, एका अन्य घटनेत एमटी वाल्थेरा नावाच्या दुसऱ्या जहाजावर अज्ञात क्षमतेच्या शस्त्राने हल्ला झाल्यामुळे आग लागली, परंतु या जहाजावरील सर्व ११ भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करण्याच्या घटनांवर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय खलाशांची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून असे हल्ले तात्काळ थांबले पाहिजेत, अशी ठाम भूमिका भारताने मांडली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचे पालन करून जलमार्गांवरील सुरळीत व विनाअथळा व्यापार सुनिश्चित करणे गरजेचे असल्याचे भारताने म्हटले असून, सर्व प्रश्न चर्चेच्या व मुत्सद्देगिरीच्या मार्गाने सोडवण्याचे आवाहन केले आहे.

