पुण्यातील इंदापूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आईच्या नावावर असलेली जमीन का विकली, या कारणावरून दोन मुलांनी ६५ वर्षीय वृद्ध शेतकरी वडील आणि त्यांच्या आजारी आईला भररस्त्यात अडवून लाकडी काठ्यांनी अमानुष मारहाण केली.
या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तुकाराम किसन राऊत (वय ६५) आणि त्यांची पत्नी अंजना राऊत हे आपल्या गावात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले असताना, संजय राऊत आणि राजेंद्र राऊत या त्यांच्या दोन्ही मुलांनी गाडीतून पाठलाग केला. रस्त्यातच त्यांना अडवून "जमीन का विकली?" असा जाब विचारत शिवीगाळ केली आणि जमिनीचा व्यवहार रद्द न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही मुलांनी हातातल्या काठ्यांनी आई-वडिलांवर बेछूट हल्ला चढवला.
या प्राणघातक हल्ल्यात तुकाराम राऊत यांच्या पाठीवर, चेहऱ्यावर व खांद्यावर गंभीर दुखापती झाल्या असून, मध्यस्थी करणाऱ्या आजारी आईच्या मनगटावर आणि कमरेवर काठीने जोरदार प्रहार करण्यात आले. रस्त्यावरील नागरिकांनी मध्यस्थी करत तातडीने पोलिसांना माहिती दिली. जखमी दांपत्याला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

