महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर लीक प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले असून याचे धागेदोरे थेट उत्तर प्रदेशशी जोडले गेले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथून आणखी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
या तिन्ही आरोपींना भिवंडीत आणून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या नवीन अटकेमुळे या हाय-प्रोफाइल घोटाळ्यात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे.
या तपासात पोलिसांच्या हाती एक अत्यंत धक्कादायक माहिती लागली आहे. अटक करण्यात आलेल्या संजय शर्मा, बाबूलाल नारायण सिंह कुशवाह आणि नरेश कुमार माहेर या तिघांची चौकशी केली असता, हे सर्वजण टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापल्या जात होत्या, तिथेच कामाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकांच्या छपाई प्रक्रियेदरम्यानच या कर्मचाऱ्यांनी पेपर लीक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या मोठ्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि हे रॅकेट किती मोठे आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सुत्रधार (मास्टरमाइंड) कोण आहे, हा लीक झालेला पेपर कोणकोणत्या उमेदवारांना किंवा कोचिंग सेंटर्सना विकला गेला आणि या रॅकेटचे जाळे देशातील इतर राज्यांमध्ये कुठे कुठे पसरले आहे, याचा कसून तपास सुरू आहे. हा तपास अजून प्राथमिक टप्प्यात असून आरोपींच्या चौकशीतून पुढे अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

