महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. आरोग्य विभागाने १ मार्च ते २० एप्रिल २०२६ या कालावधीसाठी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यात आतापर्यंत उष्माघाताचे एकूण ३९ रुग्ण आढळले असून एका संशयित मृत्यूची नोंद झाली आहे.
वाढते तापमान आणि रखरखत्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या काळात राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी सुमारे ३ लाख ३४ हजार ४६८ रुग्णांनी धाव घेतली. विशेषतः गेल्या काही दिवसांत उष्माघाताचे ८ नवे रुग्ण समोर आले आहेत. याव्यतिरिक्त, हृदयविकाराशी संबंधित कारणांमुळे १०८ मृत्यूंची नोंद झाली असून, एकूण मृत्यूचा आकडा १०९ वर पोहोचला आहे.
लातूर जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिकच प्राणघातक ठरत आहे. औसा तालुक्यातील एरंडी गावचे २५ वर्षीय महेश लिंबाजी इंगोले शेतातून काम करून घरी परतले असता, अंगणात पाणी घेताना त्यांना चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी गोंद्री गावात एका ९ महिन्यांच्या बालकाचा आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजी येथे एका शेतकऱ्याचा उष्णतेमुळे मृत्यू झाला होता. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताने तिघांचा बळी घेतला आहे.
हवामान विभागाने येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळण्याचे, जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे.

