Dailyhunt
माणुसकीला काळिमा! सिंगरौलीमध्ये आदिवासी तरुणाला अमानुष मारहाण; 'पाय पडतो, मारू नका' म्हणत असतानाही जमावाकडून आरोपीला चिथावणी

माणुसकीला काळिमा! सिंगरौलीमध्ये आदिवासी तरुणाला अमानुष मारहाण; 'पाय पडतो, मारू नका' म्हणत असतानाही जमावाकडून आरोपीला चिथावणी

मध्य प्रदेश

ध्य प्रदेशातील सिंगरौली येथून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका आदिवासी तरुणाला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये पीडित तरुण जीव वाचवण्यासाठी गयावया करत असतानाही उपस्थित जमाव त्याला वाचवण्याऐवजी हल्लेखोराला आणखी मारण्यासाठी चिथावणी देत असल्याचे दिसून येत आहे.

ही घटना सिंगरौली जिल्ह्यातील निगाही कोल हँडलिंग प्लांटजवळ घडली आहे.

अन्नेलाल बैगा असे पीडित आदिवासी तरुणाचे नाव असून, तो आपल्या पत्नीसह जंगलात जळाऊ लाकडे गोळा करण्यासाठी गेला होता. यावेळी सिक्युरिटी इंचार्ज एमडी सिंह आणि त्याच्या साथीदारांनी या दांपत्याला अडवले आणि पाईप चोरीचा आरोप करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये सिक्युरिटी इंचार्ज हॉकी स्टिकने तरुणाला अमानुषपणे मारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पीडित तरुण "मी पाय पडतो, मला मारू नका" अशी विनवणी करत असतानाही तिथे उभे असलेले लोक "डोके सोडून त्याचे बाकी सर्व हाडं मोडून टाका" असे म्हणत आरोपीला प्रोत्साहन देत होते.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नवानगर पोलीस ठाण्यात सिक्युरिटी इंचार्जसह तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एससी-एसटी ॲक्टनुसार कारवाई केली जात आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेची गंभीर दखल घेत राज्याच्या पंचायत आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री राधा सिंह यांनी पीडिताच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याला योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama