जरांगे पाटलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, तर विखे पाटलांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी
शिर्डीमराठा आरक्षणाच्या प्रलंबित मुद्द्यांवर पुढील दिशा ठरवण्यासाठी शिर्डी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील समन्वयकांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या सध्याच्या भूमिकेवर उपस्थित समन्वयकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, मराठा आरक्षण उपसमितीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षण उपसमितीच्या धर्तीवर मराठा आरक्षण उपसमितीलाही ठोस निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देण्यात यावेत, अन्यथा ही समिती तात्काळ बरखास्त करावी, अशी ठाम मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. जर या उपसमितीला कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकारच नसतील, तर समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक भूमिकाही या बैठकीत घेण्यात आली आहे. यासोबतच समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबतही समन्वयकांमध्ये सविस्तर मंथन झाले असून आगामी काळात आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले आहेत.

