उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका उच्चभ्रू भागात असलेल्या 'ब्लिंकिट' स्टोअरमध्ये गुरुवारी अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे प्रचंड खळबळबळ उडाली. मंगल पांडे नगर परिसरातील या स्टोअरमध्ये लागलेली आग इतकी वेगाने पसरली की, संपूर्ण स्टोअर आगीच्या विळख्यात सापडले आणि यामुळे आजूबाजूच्या दुकानदार व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि सुमारे एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
ही घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपेक्स टॉवरजवळ असलेल्या ब्लिंकिट स्टोअरमध्ये घडली. सुरुवातीला आगीचे रौद्ररूप पाहून चार गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या, मात्र परिस्थिती गंभीर असल्याने नंतर आणखी दोन गाड्या मागवाव्या लागल्या. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून शेजारील दुकानदारांनी सुरक्षिततेसाठी दुकाने सोडून पळ काढला, ज्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने, आगीची जाणीव होताच स्टोअरमधील सर्व कर्मचारी वेळीच सुखरूप बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता आहे, तरीही याच्या मूळ कारणाचा अधिक तपास सुरू आहे. स्टोअरच्या तळमजल्यावर किराणा आणि घरगुती सामान (ग्रॉसरी) ठेवले होते, तर वरच्या मजल्यावर इतर शोरूम होते. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्यामुळे आग वरच्या मजल्यांवर किंवा इतर दुकानांमध्ये पसरली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या दुर्घटनेत झालेल्या आर्थिक नुकसानीचा अंदाज सध्या लावला जात आहे.

