नाशिकमध्ये २०२७ साली होणारा सिंहस्थ कुंभमेळा ऐतिहासिक आणि भव्य करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत या सोहळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची घोषणा केली.
यापूर्वी मंजूर असलेल्या २२ हजार १८१ कोटींच्या आराखड्यात वाढ करून आता तो ३५ हजार कोटींवर नेण्यात आला आहे. या निधीतून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्ते, पूल, स्वच्छता यंत्रणा, भाविकांसाठी निवास व्यवस्था आणि अत्याधुनिक पर्यटन सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. विशेषतः गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पाणी प्रवाही ठेवण्यासाठी विशेष प्रकल्प राबवले जातील. ३१ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या या कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता असल्याने, सर्व कामे पारदर्शक आणि वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या विकास प्रकल्पामुळे केवळ धार्मिक वारसाच जपला जाणार नाही, तर नाशिकच्या पायाभूत सुविधांचा चेहरामोहराही बदलणार आहे.

