Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाच महिन्यांपासून एसटी बंद; विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

पाच महिन्यांपासून एसटी बंद; विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

शेवगाव-अंतरवाली सायंकाळी ५ ची बसफेरी तातडीने सुरू करण्याची मागणी; हर्षदा काकडे यांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

शेवगाव प्रतिनिधी

शेवगाव आगारातून सायंकाळी ५ वाजता सुटणारी शेवगाव-ठाकूर निमगाव-हसनापूर-कोळगाव-मंगरूळ बुद्रुक-मंगरूळ खुर्द-अंतरवाली एसटी बसफेरी गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून बंद असल्याने या मार्गावरील विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे.

विशेषतः शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रश्नाची तातडीने दखल घेत आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या विश्वस्त तथा जि.प. सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी आज दि. ९ रोजी शेवगाव आगाराचे वाहतूक नियंत्रक स्वप्निल गव्हाळ यांची भेट घेऊन सायंकाळी ५ वाजताची शेवगाव-अंतरवाली बसफेरी तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.

शहरातील शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर संबंधित मार्गावर बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना बसस्थानकावर ताटकळत थांबावे लागते. अनेक विद्यार्थ्यांकडे एसटीचे बसपास असूनही त्यांना नियमित प्रवासाची सुविधा मिळत नाही. बस उशिराने मिळाल्यास विद्यार्थिनींना अंधार पडल्यानंतर घरी परतावे लागते. त्यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

शाळेच्या वेळेनुसार बसचे नियोजन करा

विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयाच्या वेळा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने बसचे वेळापत्रक निश्चित करावे. सायंकाळी ५ वाजताची शेवगाव-अंतरवाली बसफेरी नियमित सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या मागणीची तातडीने दखल घेऊन बससेवा पूर्ववत न केल्यास संबंधित मार्गावरील विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती एसटी महामंडळाचे अहिल्यानगर विभागीय नियंत्रक, शेवगाव तहसीलदार तसेच शेवगाव पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

"विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न हा केवळ सुविधेचा नसून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सायंकाळी ५ वाजताची बसफेरी पूर्ववत सुरू करावी."

- सौ. हर्षदा काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्या, अहिल्यानगर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama