बॅटरीच्या समस्येमुळे उड्डाण रखडले, शिंदे सुखरूप
पंढरपूरमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर येथून मुंबईकडे जाण्यासाठी निघत असताना ही समस्या उद्भवली, ज्यामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ शकले नाही.
सुरुवातीच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या बॅटरीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ते उड्डाण भरू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नसून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. या तांत्रिक बिघाडानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्ते मार्गाने पुणे मार्गे मुंबईकडे रवाना झाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीचा तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदी परिसराचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर गेले होते. दौरा आटोपून मुंबईला परतत असताना हा तांत्रिक बिघाड झाला.
यापूर्वीही याच वर्षी मे महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अशाच संकटाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी खराब हवामान आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांमुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले होते. शिंदे आपल्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅडवरून मुरबाडच्या दिशेने निघाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास हेलिकॉप्टर ऐरोली परिसरात पोहोचताच हवामान अचानक बिघडले आणि दृष्यमानता अत्यंत कमी झाली. संभाव्य धोका ओळखून पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर पुन्हा जुहू येथील पवन हंस हेलिपॅडवर सुरक्षितपणे उतरवले होते. त्या प्रवासात शिंदे यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहायक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बाळसिंह राजपूत, जनसंपर्क अधिकारी विनायक पात्रुडकर, सुरक्षा रक्षक आणि विमान कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि सर्वजण सुखरूप राहिले होते.

