शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सालवडगाव शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या मावा निर्मिती कारखान्यावर शेवगाव पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल ३१ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली होती. त्यानुसार २० मे २०२६ रोजी रात्री पोलिसांच्या पथकाने सालवडगाव शिवारात छापा टाकला. यावेळी मशीनच्या साहाय्याने कच्ची व पक्की सुपारीमध्ये सुगंधी तंबाखू मिसळून मावा तयार केला जात असल्याचे उघड झाले.
कारवाईदरम्यान इम्रान निसार शेख (वय २२) व सोहेल अफ्सर शेख (वय २१, दोघे रा. सालवडगाव, ता. शेवगाव) हे दोघे जागेवर आढळून आले. पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली असता मावा तयार करण्याच्या मशीन, मोठ्या प्रमाणात सुपारी, तयार मावा, तंबाखूजन्य साहित्य, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, बॅटरी, प्लास्टिक ड्रम तसेच महिंद्रा पिकअप व टाटा एसीई अशी वाहने मिळून एकूण ३१,३८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपींकडे चौकशी केली असता हा माल मुज्जीप मुस्सा शेख व परवेज मुस्सा शेख (रा. शेवगाव) यांचा असल्याचे समोर आले. याप्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ४२७/२०२६ अन्वये भा.न्या.संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोसई बाजीराव सानप करीत आहेत.
शेवगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शेवगाव तालुक्यात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र दिसत असून गावोगावी देशी-विदेशी दारू, जुगार, मटका तसेच मावा विक्री खुलेआम सुरू असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. पोलिसांकडून अधूनमधून कारवाया होत असल्या तरी ठोस आणि सातत्यपूर्ण मोहीम राबवली जात नसल्याने अवैध व्यवसायांना अभय मिळत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
रात्री उशिरापर्यंत जुगार अड्डे मटका आणि मावा विक्रीही बिनधास्तपणे सुरू असल्याने युवक व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता पालक व्यक्त करीत आहेत.
नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्याची माहिती आहे. मात्र त्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी शेवगाव पोलिसांकडून होणार का, याकडे आता तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
अवैध धंद्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून युवकांचे भविष्य धोक्यात येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने केवळ छापेमारी न करता या अवैध व्यवसायांच्या मुळावर घाव घालावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

