सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या नव्या दरांची घोषणा केली आहे. या नवीन बदलानुसार, सर्वसामान्य गृहिणींना मोठा दिलासा मिळाला असून १४.२ किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मात्र, दुसरीकडे हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या दरात ९.५० रुपयांची वाढ करण्यात आली असून हे नवे दर देशभरात लागू झाले आहेत.
छोट्या सिलिंडरच्या श्रेणीत, ५ किलोच्या रेग्युलर घरगुती सिलिंडरचा दर ३४९.५० रुपये आणि एक्स्ट्रालाइट सिलिंडरचा दर ३३९ रुपये असा स्थिर ठेवण्यात आला आहे. परंतु, ५ किलोच्या बिगर-घरगुती व्यावसायिक भरलेल्या सिलिंडरच्या किमतीत २ रुपयांची वाढ झाली असून तो आता ७६२ रुपयांऐवजी ७६४ रुपयांना उपलब्ध होणार आहे.
राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ९.५० रुपयांनी वाढून २,७४७.५० रुपयांवर पोहोचली आहे. चेन्नईमध्ये देखील व्यावसायिक सिलिंडरचा भाव वाढून २,९१६.५० रुपये झाला आहे. मुंबईमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा दर २,७०१ रुपये झाला आहे, जो देशातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वात स्वस्त मानला जातो. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर ९४१.५० रुपयांना मिळत आहे. याउलट, लेहमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर देशात सर्वाधिक असून तेथे घरगुती सिलिंडरसाठी १,१७९ रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरसाठी ३,३८५.५० रुपये मोजावे लागत आहेत.
गेल्या १२ वर्षांतील (२०१४ ते २०२६) ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यानच्या आकडेवारीचा विचार केल्यास, इंडियन ऑइलच्या माहितीनुसार व्यावसायिक गॅसच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. यादरम्यान ६ वेळा दरात घट झाली असून ६ वेळा वाढ नोंदवली गेली आहे. २०१७ मध्ये सर्वाधिक ११५ रुपयांची वाढ झाली होती, तर २०२३ मध्ये १५७.५० रुपयांची मोठी कपात पाहायला मिळाली होती.

