Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेवगाव-पाथर्डीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे

शेवगाव-पाथर्डीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे

ताजनापूर टप्पा-दोनमधून ४६ गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न; सर्वेक्षणासाठी एक कोटींचा निधी मंजूर

अमली पदार्थांचे केंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करावी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शेवगाव प्रतिनिधी

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. मतदारसंघातील पाणीटंचाई, दुष्काळजन्य परिस्थिती, शेतीसाठी पाणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल. जायकवाडी जलाशयातून ताजनापूर लिफ्ट योजनेच्या टप्पा-दोनमधून ४६ गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून, या कामाच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मतदारसंघातील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. शेवगाव शहरात सध्या सुमारे पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात दरडोई सुमारे ४७ लिटर, तर शहरी भागात १३५ लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याबरोबरच नागरिकांनीही पाणी बचतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन विखे पाटील यांनी केले.

४६ गावांच्या पाण्यासाठी ताजनापूर टप्पा-दोन

जायकवाडी जलाशयातून ताजनापूर लिफ्ट योजनेच्या टप्पा-दोनमधून शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील ४६ गावांना शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या योजनेच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता ताजनापूर लिफ्टच्या लाभक्षेत्राला पाण्याच्या नियोजनात प्राधान्य देण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली.

जायकवाडी धरणासाठी जमिनी देणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या परिसरातील पाणीप्रश्नही गांभीर्याने सोडविण्याची आवश्यकता आहे. धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत, अशी मागणीही आमदार राजळे यांनी केली.

२८ गावांच्या पाणी योजनांसाठी १९ कोटी

शेवगाव तालुक्यातील २८ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामांच्या निविदा लवकरच काढण्यात येणार आहेत. पाणीपुरवठ्याच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्या पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका विखे पाटील यांनी मांडली.

मुळा धरणातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य भागातही अशा उपाययोजना करण्याचा विचार केला जाईल.

जनावरांच्या चाऱ्यासाठी थेट रोख मदतीचा विचार

पावसाने दडी मारल्याने काही भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पिकांची स्थिती, पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा याबाबत प्रशासन लक्ष ठेवून आहे. जनावरांच्या संख्येनुसार शेतकऱ्यांना थेट रोख मदत देण्याचा पर्याय चारा छावण्यांऐवजी विचाराधीन असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करा

शेवगाव-पाथर्डी तालुका अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम राबवावी. अमली पदार्थांची विक्री व वितरण करणारी केंद्रे कोणत्याही परिस्थितीत वाढू देता कामा नयेत. अशा केंद्रांवर कठोर कारवाई करून अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करावे, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी पोलिसांना केली.

तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी समाजानेही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तीन ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाण्यांची मागणी

खरवंडी कासार, तिसगाव आणि बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली. वाढती लोकसंख्या आणि मतदारसंघाचा विस्तार लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पोलीस ठाण्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंमका, धनंजय बडे, पाथर्डीचे पोलीस निरीक्षक बोरसे, अर्जुन शिरसाठ, शेषराव कचरे, अशोक चोरमुले, दिगंबर भावर, शेवगाव तालुकाध्यक्ष रिंकू फलके, संतोष केस भट, शेवगावच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, पाथर्डीचे मुख्याधिकारी विजय लोखंडे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. यावेळी आमदार अक्षय कर्डिले, नगराध्यक्ष अभय आव्हाड आणि पोलीस विभागाचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक नीरज राजगुरू यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. सूत्रसंचालन राजेंद्र सुरवसे यांनी केले, तर शेवगावचे पोलीस निरीक्षक भोकरे यांनी आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama