मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या समुद्र प्रचंड खवळला असून मोठ्या लाटा उसळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनी आज स्वतः वरळी समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांना तेथून बाजूला होण्याचे आणि पाऊस असेपर्यंत तिथे न बसण्याचे आवाहन केले. या भेटीदरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने महापौरांसाठी छत्री धरल्याचे पाहायला मिळाले आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, महापौरांच्या या कृतीवर नेटकऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत असून काही नागरिकांनी याला निव्वळ 'प्रसिद्धी स्टंट' असे म्हटले आहे. महापालिकेने अशा भेटीगाठी देण्याऐवजी पावसाळ्यापूर्वी शहरातील ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, उघडी मॅनहोल्स आणि इतर मूलभूत नागरी समस्या सोडवण्यावर अधिक भर द्यावा, अशी आग्रही मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

