सोमवारी संध्याकाळी इन्स्टंट मेसेजिंग अॅप 'व्हॉट्सअॅप' वापरणाऱ्या हजारो युझर्सना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. सुरक्षेचे कारण सांगत व्हॉट्सअॅपने अचानक अनेक वापरकर्त्यांची खाती २४ तासांच्या देखरेखीखाली टाकली आणि त्यावरील सर्व मेसेजिंग सुविधा ब्लॉक केल्या.
भारत तसेच इतर अनेक देशांमधील युझर्सना या समस्येचा फटका बसला. सोमवारी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास युझर्सना हे अॅप वापरताना अडचणी येऊ लागल्या.
अॅप उघडताच युझर्सच्या स्क्रीनवर एक संदेश दिसू लागला, ज्यामध्ये त्यांचे खाते तपासणीच्या चौकटीत असून त्यावरील हालचाली आणि उपकरणांशी संबंधित माहितीची पडताळणी सुरू असल्याचे नमूद केले होते. तसेच यासंदर्भात २४ तासांच्या आत पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे ज्या लोकांचा व्यवसाय आणि रोजचे काम व्हॉट्सअॅपवर अवलंबून आहे, त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. संतापलेल्या युझर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वर आपल्या तक्रारींचा पाऊस पाडला.
या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, अॅपचा गैरवापर करणाऱ्या संशयास्पद खात्यांवर आणि घटकांवर आमचे सतत लक्ष असते. वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून अशा खात्यांवर तातडीने कारवाई केली जाते. मात्र, काही वेळा तांत्रिक चुकीमुळे किंवा गैरसमजामुळे सामान्य वापरकर्त्यांची खातीही प्रभावित होतात. अशी चूक निदर्शनास आल्यास ती लवकरात लवकर सुधारून खाते पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

