दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या विविध विद्याशाखांमध्ये तंत्रशिक्षण ही अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमधून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञ, अभियंता तसेच उद्योजक होण्याची संधी उपलब्ध होते. दहावीनंतर तीन वर्षांच्या कालावधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याबरोबरच रोजगार व उद्योग क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधूनच रु. 1 लाख प्रति महिना पगाराच्या नोकऱ्या औद्योगिक क्षेत्राकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे, असे चंद्रकांतदादा म्हणाले.
तंत्रशिक्षण संचालकांच्या मार्गदर्शनाने, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून पदविका अभ्यासक्रमासाठी NEP 2020 अनुरूप अद्यावत 'K Scheme' अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
ही आहेत त्याची काही ठळक वैशिष्ट्येः
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास करण्याच्या दष्टीकोनातून 9 Centres of Excellence (Robotics, IoT, 3D Printing), 41 Multipurpose Computer Centres व 5 E-Yantra Labs ची स्थापना करण्यात आलेली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अद्यावत अभ्यासक्रम व विविध उपक्रमांमुळे शैक्षणिक वर्ष 20२२-२३मध्ये 80 टक्के असलेली पदविका अभ्यासक्रमांच्या एकुण प्रवेशित विद्यार्थ्यांची टक्केवारी शैक्षणिक वर्ष 2025-26मध्ये 95 टक्के एवढी झालेली आहे.
पदविका प्रवेशप्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील तसेच प्रवेशासंबंधी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी, नावनोंदणी व अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

