Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महिला क्रिकेट संघाने तरी राखली भारताची अब्रू!

महिला क्रिकेट संघाने तरी राखली भारताची अब्रू!

Kiran Hegde Live 5 days ago

क्रिकेटच्या पंढरीत जगप्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर हरमनप्रित कौरच्या भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव ऐतिहासिक कसोटी सामन्यात १७० धावांनी दणदणीत विजय मिळवून भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक पराक्रम नोंदवला.

काही महिन्यांपूर्वी आपल्या घरच्या मैदानावर झालेली वन डे विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदा जिंकून भारतीय महिला संघाने आपली वाढती ताकद दाखवून दिली होती. श्रेयस अय्यरच्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाला आर्यंलड, इंग्लंड‌विरुद्धच्या टी २० मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागत असताना भारतीय महिला क्रिकेट संघाने मात्र‌ ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटी जिंकून भारतीय क्रिकेटची थोडीफार अब्रू वाचवली. भारतीय पुरुष क्रिकेट संघाला लॉर्ड्स मैदानावर पहिला कसोटी विजय मिळवण्यासाठी तब्बल ५४ वर्षं वाट बघावी लागली होती. परंतु भारतीय महिला संघाने आपल्या पहिल्याच कसोटीत इंग्लंड‌ संघाला धूळ चारल्याने या विजयाला एक वेगळी किनार आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक करु तेवढे कमीच आहे.

१९३२ साली भारतीय पुरुष संघ आपला पहिला कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला होता. भारतीय पुरुष संघाने कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली पहिला कसोटी सामना १९८६ साली जिंकला. त्यानंतर आणखी अवघे दोन कसोटीत भारतीय संघाला विजय मिळवता आले. त्यानंतर महेंद्र सिंग धोनी कर्णधार असताना २०१४मध्ये आणि विराट कोहली कप्तान असताना २०२१मध्ये भारताने आणखी दोन विजय येथे मिळविले. एकंदर लॉर्ड्स मैदानावर भारतीय पुरुष संघाची कामगिरी‌ फारशी समाधानकारक नाही हेच खरे. भारतीय महिला संघाने लॉर्ड्स कसोटी २७० धावांनी जिंकून कसोटीत आपल्या चौथ्या मोठ्या विजयाची नोंद केली. योगायोग म्हणजे भारतीय महिला संघाचा सर्वात मोठा विजय इंग्लंड‌ संघाविरुद्धच आहे. २०२३मध्ये नवी मुंबईत डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंड‌ला भारताने तब्बल ३४७ धावांनी पराभूत करुन‌ आजवरचा आपला सर्वात मोठा कसोटी विजय नोंदवला होता.

लॉर्ड्स येथील विक्रमी विजयात कर्णधार हरमनप्रित कौरचे कल्पक नेतृत्त्व कारणीभूत होतेच. तसेच स्मृती मंधना, यष्टीरक्षक यास्तिका भाटिया, वेगवान गोलंदाज क्रांती गौड, फिरकी गोलंदाज स्नेहा राणा या चौघींचा मोठा वाटा होता. आपला ३००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या स्मृतीने दोन्ही डावात शानदार अर्धशतके काढली. माजी कर्णधार मिताली राज, सध्याची कप्तान हरमनप्रित कौर यांच्यानंतर ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी स्मृती केवळ तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. भारतातर्फे दोन्ही डावांत अर्धशतके काढणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरली. या कसोटीत स्मृतीने आंतरराष्ट्रीय सामन्यातील आपल्या दहा हजार धावांचा टप्पादेखील ओलांडला. आता आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये स्मृती तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुजी बेटस आणि मिताली राज या दोघीच तिच्यापुढे आहेत.

दुसऱ्या डावात यास्तिका भाटियाने शानदार शतकी खेळी करुन भारतातर्फे नवा अध्याय लिहला. भारतीय महान फलंदाज सचिन तेंडुलकरलादेखील लॉर्डस मैदानावर शतक काढता आले नाही. पण भाटियाने शतक ठोकून भारताची दुसऱ्या डावात आघाडी मोठी करुन इंग्लंडला पराभवाचा खाईत लोटले. २५ वर्षीय भाटिया दुखापतीमुळे भारतात झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेला मुकली होती. पण त्या दुखापतीमधून सावरत तिने जोरदार कमबॅक केले. तेव्हा भाटियाऐवजी उमा छेत्रीला संधी मिळाली होती. विशेष म्हणजे भाटियाने आपल्या तीनही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पर्दापण केले ते ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध. स्धानिक स्पर्धांत भाटिया बडोद्याचे प्रतिनिधीत्व करते. महिला आयपीएलमध्ये ती गुजरात जायंट्सतर्फे खेळते. तिच्या यशात वडिलांचा मोठा वाटा आहे. कोविड काळात बाहेर मैदानावर सराव बंद असताना तिच्या वडिलांनी खिशाला चाट देत आपल्या घराजवळच खेळपट्टी तयार केली होती. विशेष म्हणजे यास्तिकाचे आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे पहिलेच शतक होते. तिने १५८ चेंडू खेळताना १४ चौकार मारुन ११३ धावा फटकावल्या.

याअगोदर लॉर्ड्स मैदानावर भारतातर्फे विनू मंकड, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सौरव गांगुली, महमद अझरुद्दीन, अजित आगरकर, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल यांनी शतके‌ काढली आहेत. येथे तीन शतके काढणारा दिलीप वेंगसरकर हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. वेगवान गोलंदाज क्रांती गौडने पहिल्या डावात अवघ्या ३७ धावांत ५ बळी घेऊन इंग्लंड‌ची दाणादाण उडविली. त्यामुळे इंग्लंड‌चा डाव अवघ्या १७० धावांत आटोपला. विजयासाठी दुसऱ्या डावात इंग्लंड‌समोर ४५७ धावांचे मोठे लक्ष्य होते. पण स्नेहा राणाच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंड‌ फलंदाज गावले. तिने ४ बळी टिपले. क्रांतीने परत दोन बळी घेऊन इंग्लंड‌च्या जखमेवर मीठ चोळले. सायली सातघरे, दिप्ती शर्मानेदेखील प्रत्येकी दोन बळी घेऊन या दोघींना छान साथ दिली. त्यामुळे इंग्लंड‌चा दुसरा डाव १८६ धावांत संपला. इंग्लंड‌ कप्तान नेट सिवर बंटने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला पहिली फलंदाजी दिली. पण त्याचा फारसा फायदा इंग्लंड‌ गोलंदाज घेऊ शकले नाहीत. भारताने पहिल्या डावात २८५ धावांची चांगली मजल मारली. दुसऱ्या डावात तर भारतीय फलंदाजांनी इंग्लंड‌च्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दुसऱ्या डावात भारताने ७ बाद ३४१ या धावसंख्येवर आपला डाव घोषित करुन इंग्लंडसमोर विजयासाठी ४५७ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले.

शतकी खेळी करणारी भाटिया आणि ५ बळी घेणारी क्रांती या दोघींना मैदानाच्या पॅव्हेलियनमध्ये असलेल्या "ऑर्नस बोर्ड"मध्ये सामील होण्याची संधी मिळाली. १९३४ साली महिला क्रिकेट सामन्यांना सुरूवात झाली. तब्बल ९२ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर अखेर क्रिकेटच्या पंढरीत पहिला कसोटी सामना खेळला गेला. याच ऐतिहासिक मैदानावर १८८४ साली यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिलावहिला कसोटी सामना झाला. त्यामध्ये पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने रंगतदार लढतीत अवघ्या ५ धावांनी बाजी मारली होती. १९७६पासून‌ भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी सामन्यांचा श्रीगणेशा केला. भारत आतापर्यंत एकूण ४३ कसोटी सामने खेळला. त्यात ९ सामने जिंकले. ७ गमावले. २७ अनिर्णित राहिले. विशेष म्हणजे इंग्लंड‌मध्ये भारतीय महिलांनी एकही कसोटी गमावली नाही. तेथे‌ आतापर्यंत झालेल्या १० कसोटीत भारताने ३ सामने जिंकले. ७ सामने अनिर्णित ठेवण्यात भारताला यश आले. हा सामना जिंकून भारताने येथे अगोदर झालेल्या टी ‌२० विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरी‌वर पांघरुण घातले. विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान गटातच आटोपले होते. भारताने पहिल्या दिवसापासून सामन्यावर घेतलेली मजबूत पकड शेवटपर्यंत ढिली होऊ दिली नाही. खेळाच्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन प्रमुख अंगात भारताने शानदार कामगिरी करुन इंग्लंडवर बाजी उलटवली. लॉर्डस कसोटी जिंकून भारतीय महिला संघाने एका नव्या सुर्वणयुगाची सुरूवात केली आहे. पुढील काळात त्यांची ही विजयी दौड कायम राहील अशी आशा करुया.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kiran Hegde Live