Dailyhunt
मिसिंग लिंकवर सेल्फी काढाल तर पावती फाटेल मोठ्या दंडाची!

मिसिंग लिंकवर सेल्फी काढाल तर पावती फाटेल मोठ्या दंडाची!

Kiran Hegde Live 1 week ago

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

द्रूतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून अशाप्रकारे वाहन थांबवणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागेल. या मार्गावर असलेल्या कॅमेरांमधून तुम्हाला पकडण्यात येईल आणि दंडाची पावती थेट मोबाईलवर पाठवली जाईल.

महाराष्ट्र दिनी रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे मार्गावर मिसिंग लिंकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे या मिसिंग लिंकवर वेगमर्यादा जाहीर केली आहे. बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेगमर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला गेला आहे. मिसिंग लिंकवरील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रूतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे. मग त्यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल.

या मार्गावर तसेच मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर सेल्फी, फोटो आणि रिल काढण्यासाठी थांबू नका. यामुळे तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो. या कारणास्तव, नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kiran Hegde Live