केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय, मुंबईचे उपमहासंचालक कॅ. लवकेश ठाकूर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्नल अक्षय यादव आणि लेफ्टनंट कर्नल ध्रुव यांनी त्यांचे स्वागत केले.
या भेटीत त्प्रयांनी विविध विषयांवर आपल्मुया सहकाऱ्यांशी चर्चा केली.
चर्चेतले ठळक मुद्दे आणि चर्चा:
कामगिरीचा आढावा: दौऱ्यादरम्यान विजय यांनी प्रादेशिक कार्यालयाच्या कामकाजाची सद्यस्थिती, कामगिरी आणि स्थानिक आव्हाने जाणून घेण्यासाठी येथील पथकाशी सविस्तर चर्चा केली.
भविष्यातील रोडमॅप: मुंबई कार्यालयाचे धोरणात्मक उपक्रम, क्षेत्रीय उपक्रम आणि भविष्यातील कृती आराखडा यावर आधारित एका सर्वसमावेशक सादरीकरणाद्वारे त्यांना माहिती देण्यात आली.
डिजिटल सेवांना गती: महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या राज्यांमध्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये डिजिटल सेवांचा वापर वाढवणे आणि तंत्रज्ञानावर आधारित आधार सेवा वितरण अधिक बळकट करणे, हा या पुनरावलोकन बैठकीचा मुख्य उद्देश होता.
देशभरात सुरक्षित, विनाव्यत्यय आणि नागरिक-केंद्री ओळख सेवा प्रदान करण्यासाठी युआयडीएआय कटिबद्ध आहे. अधिकाऱ्यांनी डेटा सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचा सर्वोच्च दर्जा राखत, नागरिकांचा अनुभव अधिक सुकर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, अशी सूचना सौरभ विजय यांनी यावेळी केली. विश्वासार्ह डिजिटल ओळखीच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम बनवण्याच्या युआयडीएआयच्या मोहिमेसाठी मुंबई प्रादेशिक कार्यालय पूर्णपणे समर्पित आहे, असे मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक कॅ. ठाकूर यांनी सांगितले.

