Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तळहाताला खाज सुटली आणि टायगरजवळ फुटले फटाके!

तळहाताला खाज सुटली आणि टायगरजवळ फुटले फटाके!

Kiran Hegde Live 3 days ago

वर्षभरापूर्वी जुहूच्या मेहमूद चौकातील रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर लॉरेन्स बिष्णोईच्या गुंडानी अंदाधुंद गोळीबार केला होता व अवघ्या पाच मिनिटात तो समाजमाध्यमावर प्रसारितही केला गेला होता.

अगदी तीच पद्धत काल रात्रीही पुष्पा पार्क येथे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा, तरुण अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करून बिष्णोईचे हल्लेखोर पसार झाले. इतका संवेदनशील विभाग असूनही पोलिसांची गुप्तचरयंत्रणा हल्लेखोरांनी कुचकामी करून दाखवली, हे खरोखरंच खेदजनक आहे. पोलिसांनी कालच्या पुष्पा पार्कजवळील हल्लेखोरांना काही तासांतच जेरबंद करण्यात यश मिळवले असले तरीही हे यश काहीसे काळवंडलेले आहे, असेच म्हणावे लागेल.

गेल्या वेळी (शेट्टी) अनमोल बिष्णोईने जबाबदारी घेतली होती व परदेशातून त्याला आणण्यासाठी पोलीस व सरकारला जंग जंग प्रयत्न करावे लागले होते, हे वाचकांना आठवत असेलच. इतके करूनही हा खटला काही इंचभरही पुढे सरकलेला नाही. (जय हो न्यायदेवता की…) शेट्टी प्रकरणात हजारो पानांच्या आरोपपत्रातून संशयितना दोषी सिद्ध करणे खरंतर महामुश्किल काम आहे. त्यात अजून खटल्याला रीतसर सुरुवातच झालेली नाही. असो. काहीसे विषयानंतर झाले. कारण ते अपरिहार्य होते. घटना जुहू परिसरातच झाली होती. बिष्णोई गँग, सलमान खान आणि त्याने केलेल्या काळ्या हरणाची शिकार, हा गेले सुमारे 20 वर्षे चावून चोथा झालेला विषय आहे. (सलमान आपल्या ठिकाणी आहेच.) या विषयात बिष्णोई गँगने पाच वर्षांपूर्वी लक्ष घालून बिष्णोई समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी 'शपथ' वाहिली आहे. अधूनमधून अभिनेता सलमान खान यांच्या वांद्र्यातील बंगल्यावरही गोळीबाराचे 'फटाके' फोडण्यात येतात.

तळहाताला खाज आली…

या फटाक्यांबाबत सिनेसृष्टी तसेच गुन्हेगारी जगताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सूत्रांनी थेट काही सांगण्यास नकार दिला. मात्र गँग्सप्रमुखांच्या 'तळहाताला खाज' सुटू लागली की, अशाप्रकारे फटाके फोडले जातात, असे त्यांनी सूचित केले. याआधीही असेच प्रकार झाल्याचे माहितीगारांनी सूचित केले. इतकेच नव्हे तर मध्यस्थामार्फत सलमानशी चर्चा पण झाल्याची माहिती आहे. (ही चर्चा सुमारे सातआठ वर्षांपूर्वी झाली होती.) कालची घटना झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात अनिल पंडित नावाच्या हरियाणाच्या गुंडाने बिष्णोई गँगनेच हा हल्ला केल्याचे जाहीर केले. अभिनेता सलमान खानबरोबर कोणतेही काम केल्यास हाच 'परिणाम' भोगावा लागेल, अशी धमकीवजा सूचनाही दिली गेली असून कुविख्यात दाऊद इब्राहिम व सलमान यांचे संबंध जोवर आहेत तोवर या लढाईला अंत नाही, असेही पंडितने जाहीर केले. मला समाजमाध्यम कम्पन्यांचे नवल वाटते. कारण आपली एखादी पोस्ट किंवा निवेदन वावगे वाटले तर याच कम्पन्या ते मागे ठेवतात (सध्याच्या आंदोलनाच्या काळात हे प्रकर्षाने जाणवत आहे.) मात्र अशा गुंडाच्या पोस्ट बिनदिक्कत सर्वत्र फिरत असतात, हे दिसून आले.

गुप्तचरयंत्रणा सक्षम हवी

मुंबई पोलिसांनी त्वरेने हालचाल करून काही संशयितांना ताब्यात घेतले हे निश्चितच अभिनंदनीय आहे. मात्र यंत्रणेचा सर्व फोकस पोलीस आयुक्तांवरच असतो हे काहीसे खटकणारे आहे. शेवटी सर्व श्रेय त्यांच्याकडेच जाते यात वाद नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हे वार्तांकन करत असल्याने याआधी हा सर्व मान (?) गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांचा असतो, असे नकळत मनावर कोरले गेले आहे. असो. कार्यपद्धतीत बदलही होत असतात हे मान्य. परंतु जी जी व्यक्ती ती शाखा सांभाळते त्याला त्याचे विहित श्रेय देणे योग्य नाही का? शेवटी इतक्या मोठ्या पोलीस दलाचे नेतृत्त्व करत असताना हाताखालच्या अधिकाऱ्यांनाही पुढे आणण्याचे काम नेत्यांनी केले पाहिजे, असे मानणाऱ्यांपैकी मी आहे. सर्वाना पुढे येण्यास संधी मिळाल्यास सांधिक यश अधिक उज्ज्वल ठरते, असे म्हणतात. याबाबत राजकारण न करता गुन्हेगारी जगतातील 'खबऱ्यांचे नेटवर्क' अधिक मजबूत करण्यावर सर्वांनीच भर दिला पाहिजे. मुंबई पोलीस दलासाठी असलेला 'सिक्रेट फंड' वापराविना पडून असल्याच्या वार्ता आहेत. तो 'ईदम न मम..' करत पाणी सोडून सत्कर्मासाठी द्यावा, असे सुचवून रजा घेतो. राम कृष्ण हरी…

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kiran Hegde Live