होम
ग्रंथालय कर्मचारी होणार स्मार्ट !

मालवण : ग्रंथालय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालय या विभागातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या सही शिक्क्याचे ओळखपत्र मिळावे, याबाबतचे निवेदन राज्य ग्रंथालय कृती समितीच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिले होते. ना. सामंत यांनी याबाबत तात्काळ ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांना दूरध्वनीवरून आदेश देत जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या सहीने ओळखपत्र देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याने ओळखपत्र वितरित करण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय कृती समिती अध्यक्ष संजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ग्रंथालय कायदा १९६७ मध्ये अस्तित्वात आला. परंतु या कायद्यामध्ये अद्याप कोणतीही दुरुस्ती अथवा सुधारणा झालेली नाही. यासाठी राज्य ग्रंथालय संघ, राज्य ग्रंथालय कर्मचारी संघटना आणि राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समिती यांच्यावतीने अनेकवेळा आंदोलने करूनही आणि संबंधित मंत्र्यांना निवेदने देऊनही ग्रंथालय कायद्याला ५० वर्षे उलटूनही या कायद्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. साहजिकच ग्रंथालयात काम करणाऱ्या सेवकांना सेवा शाश्वती अथवा ग्रंथालयात काम करत असल्याचा अधिकृत पुरावा मिळत नव्हता. यासाठी राज्य ग्रंथालय कृती समितीच्या काही महत्वाच्या मागण्यांपैकी एक मागणी म्हणजे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना शासनाच्या ग्रंथालय संचालनालय या विभागातील जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या सही-शिक्क्याचे ओळखपत्र मिळावे, अशी होती. या मागणीसाठी कृती समितीतर्फे माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अनेकवेळा निवेदने देऊन वा प्रत्यक्ष भेटून याबाबत विनंती करण्यात आली होती. परंतु ग्रंथालय कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मिळाले नव्हते. अलिकडेच राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष रवींद्र कामत आणि त्यांचे कोल्हापूर येथील २२ कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष अनिल शिवडावकर, सदस्य सुशिल निब्रे, पूनम नाईक यांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांना याबाबत निवेदन देऊन विनंती केली होती. त्यानुसार मंत्र्यांनी तात्काळ ग्रंथालय संचालक इंगोले यांना दूरध्वनीवरून आदेश दिले आणि ओळखपत्र जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्याच सहीने देण्याच्या सूचना केल्या होत्या, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.
कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, मालवण