Tuesday, 04 May, 10.45 pm कोलाज

होम
मासिक पाळीविषयी फेक न्यूज वायरल का होत राहतात?

मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा.

गर्भाशय हा बाईच्या शरीरातला एक प्राण्यासारखा अवयव असतो. तो आतल्या आत इकडून तिकडे फिरतो. बाईला होणाऱ्या बहुतेक शारीरिक आजारांमागचं कारण हे फिरणारं गर्भाशय असतं. एखाद्या बाईला फेफरं येत असेल, ती मानसिक रोगी असेल तर त्यामागचं कारणही हे फिरणारं गर्भाशय आहे. बाळ किंवा गर्भ नसल्यानं गर्भाशय उदास होतं आणि असं शरीरभर असं फिरत राहतं.

ही वर सांगितलेली माहिती म्हणजे प्राचीन ग्रीसमधलं विज्ञान. प्लेटो सारख्या महान विचारवंतानं त्याच्या 'टिमियस' या पुस्तकात असा उल्लेख केला आहेच. पण त्याचसोबत प्राचीन ग्रीसमधले अनेक डॉक्टर या माहितीला वैज्ञानिक मानून त्यानुसार बाईवर उपचार करायचे. त्यांच्या मेडिसिनच्या पुस्तकातूनही हेच मांडायचे.

आज आपलं विज्ञान फारच प्रगत झालंय. गर्भाशय फिरत वगैरे नाही, त्याचा आणि मानसिक आरोग्याचाही काही संबंध नाही हे आपल्याला माहीत आहेच. त्याबरोबरच गर्भाशय, मासिक पाळी, गर्भाचा जन्म याबाबत भरपूर वैज्ञानिक माहिती आपल्याकडे आहे. तरीही बाईचं गर्भाशय आणि मासिक पाळीबद्दलच्या वैज्ञानिक वाटणाऱ्या अशा खोट्या समजुती संपलेल्या नाहीत.

पाळी म्हणजे आजार?

नुकतंच १८ वर्षांच्या पुढच्या सगळ्या नागरिकांसाठी कोरोनाविरोधी लसीकरण सुरू होणार हे जाहीर झाल्यानंतर लसीकरण आणि मासिक पाळी यांचा सहसंबंध लावणारा एक मेसेज वायरल झाला होता. मासिक पाळी दरम्यान मुलींची आणि बायकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे चालू होण्यापूर्वी ५ दिवस, मासिक पाळीचे ५ दिवस आणि पाळीनंतर ५ दिवसात लस घेऊ नये, असं या मेसेजमधे लिहिलं होतं.

या मेसेजमधली धाटणी, त्याची भाषा, त्यात वापरलेले शब्द हे सगळं पाहता हा मेसेज वैज्ञानिक आहे, असं वाटून एक दोन दिवसांतच प्रचंड वायरल झाला. त्यानंतर लगेचच मेसेजमधली चुकीची माहिती अवैज्ञानिक आहे हे सांगणारे वीडियो, फोटो, लेखही वायरल झाले. मुळातच रोगप्रतिकारक शक्ती कमी करायला पाळी म्हणजे आजार किंवा रोग नाही. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळेच या काळात लस घ्यायला काहीही हरकत नाही, हे शक्य त्या सगळ्या माध्यमातून सांगितलं गेलं. प्रश्न तेवढ्यापुरता सुटला.

पण मासिक पाळीच्या बाबतीत वायरल झालेला हा काही पहिला मेसेज नाही. अशाप्रकारे वैज्ञानिक वाटावेत असे अवैज्ञानिक, खोट्या माहितीचे मेसेज इंटरनेटवर अनेकदा फिरत असतात. मासिक पाळीच्या काळात बाईच्या शरीरातून निगेटिव एनर्जी येत असते, किंवा बाई तीव्र पॉझिटिव मॅग्नेटिक फिल्डमधून जात असते अशी वैज्ञानिक भाषेत लपेटलेली चकचकीत खोटी माहिती वॉट्सअप युनिवर्सिटीत अगदी सहज मिळते. तीही फ्री फ्री फ्री!

खरंतर मासिक पाळी ही श्वास घेण्याइतकी नैसर्गिक गोष्ट. तरीही त्याविरोधात मोजताही येणार नाहीत इतक्या अंधश्रद्धा निर्माण झाल्या. आधुनिक विज्ञान विकसित झाल्यावर तरी या अंधश्रद्धा आटोक्यात येणं अपेक्षित होतं. पण उलट, या खोट्या विज्ञानाचा वापर करून पाळीच्या अंधश्रद्धाच कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याचे प्रयत्न का सुरू असतील याचा शोध घ्यायला हवा.

साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

मासिक पाळीचं फिजिक्स

जितक्या विविधतेने नटलेला आपला देश आहे तितकीच विविधता पाळीच्या अंधश्रद्धांमधेही दिसते. त्यात पाळी सुरू असताना घरात मुलीला, बाईला बाजुला बसवणं हा अंधश्रद्धेचा प्रकार फारच कॉमन आहे. अनेकदा अगदी बाजुला बसवत नसले तरी देवघरात जायचं नाही, लग्न समारंभात, सणवारात सहभागी व्हायचं नाही, लोणची पापडाला, काही झाडांना शिवायचं नाही हे तर अगदी कसोशीने पाळलं जातं. मासिक पाळीबद्दलचा एक तिरस्कार, कटकट असल्याची भावना आपल्या प्रत्येकाच्याच मनात असते.

मासिक पाळीचं रक्त अपवित्र असतं हा त्यामागचा मूळ समज. हा समज विज्ञानाने खोटा ठरवला. तेव्हा या अंधश्रद्धांचं मॉडर्न स्वरूप, अंधश्रद्धांमागचं वैज्ञानिक कारण पुढे केलं जाऊ लागलं. मासिक पाळीच्या काळात बाईच्या शरीरात निगेटिव एनर्जी असते. याउलट मंदिरासारख्या ठिकाणी पॉझिटिव एनर्जी असते. या दोन एनर्जी एकत्र झाल्या तर त्यातून वाईट घडणारच. वर बायोलॉजीपासून कोसो दूर जात याला फिजिक्सच्या प्रोटॉन न्युट्रोन्सचं उदाहरण जोडलं की त्याच्या वैज्ञानिकतेविषयी शंकाच घेता येत नाही.

अंधश्रद्धांची 'वैज्ञानिक' कारणं

अशावेळी मासिक पाळीच्या काळात बाईच्या शरीरातली उष्णता फार वाढलेली असते, अशात तिने अन्नाला स्पर्श केला तर ते अन्न खराबच होणार ना? असा प्रश्न विचारून गप्प केलं जातं. मासिक पाळी चालू असताना बाईनं अन्नं शिजवलं तर पुढचा जन्म कुत्रीचा येतो असं म्हणणारे स्वामी कृष्णस्वरूपदास खरंतर कसे विज्ञानाला धरूनच बोलत होते हे सांगण्याचा हा अट्टहास असतो.

मागे शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश द्यायचा की नाही यावरून वाद चालला होता. शबरीमाला मंदिरात जाण्यासाठी जंगलातून जावं लागतं. बायकांची मासिक पाळी चालू असेल तर त्यांच्या रक्ताचा वास अस्वल, वाघ अशा जंगली प्राण्यांना लगेच येतो, हे महिलांना मंदिर प्रवेश नाकारण्याचं 'वैज्ञानिक' कारण दिलं गेलं. अशी एक ना अनेक उदाहरणं देता येतील.

वैज्ञानिक पायाची गरज

वैज्ञानिक वाटावेत म्हणून हे मेसेज मुद्दामच इंग्रजी भाषेत दिलेले असतात. त्यात अवघड, सामान्य माणसाला समजणार नाही असे वैज्ञानिक शब्द वापरलेले असतात. अनेकदा मेसेजमधली जवळपास निम्मी माहिती खरी, वैज्ञानिक असतेही. त्यामुळे मेसेज खराच आहे, यावर लगेच विश्वास बसतो. पण उरलेल्या माहितीत मात्र शब्दांचे खेळ करून आपल्याला हवा तो परंपरावादी दृष्टिकोन व्यवस्थित पेरला जातो.

बहुतेक वेळा शिक्षण घेतलेले अगदी डिग्री, पीएचडी झालेले उच्चशिक्षित स्त्री पुरुष या अवैज्ञानिक विज्ञानाचा उदो उदो करताना दिसतात. धर्माने परंपरेने सांगितलेल्या, आपली आई, आजी इतकी वर्ष पाळत आल्यात त्या गोष्टी चुकीच्या कशा असू शकतात हा समज पचवणं विज्ञान शिकलेल्यांना जरा अवघडच जातो.

मासिक पाळीतली अस्पृश्यता, पूर्वीच्या परंपरा कशा ग्रेट आहेत, कशा वैज्ञानिक आहेत आणि म्हणून आजही पाळल्या पाहिजेत याची आठवण समाजाला सतत करून देणं, पाळीच्या अंधश्रद्धांना वैज्ञानिक पाया घालून देणं हेच या अवैज्ञानिक मेसेजमागचं खरं कारण आहे.

गुढतेचं वलय

योनिमार्गातून रक्त येण्याचं नेमकं कारण माहीत नसल्यामुळे मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या शरीरात अतिमानवी शक्तींचा वावर असतो, या समजातून प्राचीन टोळींमधे मासिक पाळीविषयीच्या अंधश्रद्धा सुरू झाल्या असल्याचं लेखिका अरूणा देशपांडे यांनी त्यांच्या 'एका शापाची जन्मकथा' या पुस्तकात लिहिलंय. त्या पुढे लिहितात 'सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ मार्गारेट मीड यांच्या मताप्रमाणे प्राचीन टोळी समाजात राहणाऱ्या आदिमानवाला रक्ताबद्दल भीती वाटत असे. कारण रक्त म्हणजे जीवन आणि रक्तस्राव म्हणजे धोका, मृत्यूचे भय!'

'साहजिकच कोणतेही बाह्य कारण नसताना म्हणजे जखम न होता विशिष्ट कालांतराने स्त्रीला आपोआप होणारा रक्तस्राव अतिशय धोकादायक मानला जाऊ लागला. त्याच्याभोवती गूढतेचे, भीतीचे वलय निर्माण झाले. या गूढ रक्तस्रावाच्या संपर्कातून इतरांना वाचवण्यासाठी अशा स्त्रियांना वेगळे ठेवण्यात येऊ लागले. त्यांच्या हालचालींवर आणि आहारविहारांवर बंधने घालण्यात आली.'

मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?

पुरुषापेक्षा बाई दुय्यम

मृत्यूच्या भयानं मासिक पाळीच्या अंधश्रद्धेला जन्म दिला. पुढे तरी धर्मग्रंथात आणि आयुर्वेदासारख्या वैद्यकशास्त्रात सांगितलेल्या नियमावलींनी या अंधश्रद्धांना खतपाणी घातलं. आधुनिक विज्ञानानं पाळीभोवतीची ही गुढता कमी करायला बरीच मदत केली. पाळी म्हणजे अतिमानवी शक्ती, नाही तर सृजनासाठीची आवश्यक गोष्ट आहे हे माहीत झाल्यावर त्या भोवतीचं मृत्यूचं भयही कमी झालं. पण मासिक पाळीभोवती असणारं हे गुढतेचं वलय पुरुषसत्तेसाठी फायद्याचं आहे.

अंधश्रद्धांमुळे मासिक पाळी ही नेहमीच कटकट किंवा बाईच्या जातीला मिळालेला शाप अशा स्वरुपात पाहिली गेलीय. यामुळेच मासिक पाळीविषयी, स्त्री शरीराविषयी आणि परिणामी स्त्री अस्तित्त्वाविषयी एक घाणेरडी, अपावित्र्याची भावना निर्माण करणं सोपं झालं. साहजिकच पुरुषापेक्षा बाई दुय्यम आहे हे खोटं प्रस्थापित करून पुरुषी वर्चस्व सहज टिकवून ठेवता येतं. आधुनिक विज्ञानानं याला धोका बसू नये म्हणूनच अंधश्रद्धांना वैज्ञानिक पाया देणारे असे निगेटिव एनर्जी आणि लसीकरणाच्या मेसेजची गरज भासते.

मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती देणारी अनेक पुस्तकं आज बाजारात आहेत. पण त्यातला कुठल्याही पुस्तकात कधीही त्यभोवतीच्या अंधश्रद्धांची विस्तृत चर्चा केलेली नसते. वैज्ञानिक माहितीसोबत मासिक पाळीच्या अंधश्रद्धांविषयी आपण बोलत नाही तोपर्यंत त्याभोवतीचं गुढतेचं वलय कमी होणारं नाही. असं झालं नाही तर आज फक्त आपण मासिक पाळीच्या काळात लस घेऊ नये हे ऐकतोय. पण उद्या विज्ञान कितीही प्रगत झालं तरी मासिक पाळी सुरू असणाऱ्या बाईनं लसीला हात लावला तर निगेटिव एनर्जीमुळे लसीची परिणामकारकता संपते हेही लवकरच ऐकायला मिळेल.

'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण

#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?

नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Kolaj
Top