Saturday, 23 Jan, 1.31 pm ॲग्रोवन ई-ग्राम

चालू घडामोडी
बापरे! बर्ड फ्लूने राज्यातील 'इतक्या' पक्ष्यांचा मृत्यू

पुणे - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. राज्यात गुरुवारी (ता.२१) सुमारे ७०० पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सुमारे ६०० कोंबड्यांचा समावेश आहे. राज्यात ८ जानेवारीपासून गुरुवार (ता.२१) अखेर सुमारे १३ हजार कोंबड्या अन् पक्ष्यांच्या मृत्यू, तर ३८ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्‍तालयाकडून देण्यात आली.

राज्यात बर्ड फ्लूच्या प्रभावित क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २१) राज्यात ६२६ कोंबड्या, ३७ कावळे आणि ६९ इतर पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे झाली आहे. तर सुमारे २ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती होती.

भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्‍यातील मावंदा, रायता, सातारा जिल्ह्यांतील लोणंद तालुक्‍यातील मरीआईवाडी, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्‍यातील वरवटी, लातूर जिल्ह्यांत रेणापूर तालुक्‍यातील दावणगाव, नांदेड जिल्ह्यांत कंधार तालुक्‍यातील चिखली, किनवट तालुक्‍यात तलाहारी, नागपूर जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्‍यातील वारंगा आणि गडचिरोली येथील काही नमुन्यांचा समावेश आहे.

पोल्ट्रीपासून एक किलोमीटर त्रिज्येच्या अंतरातील सर्व सुमारे ३८ हजार कोंबड्या, ३५ हजार अंडी आणि ५२ हजार किलो पशुखाद्य आजपर्यंत शास्त्रोक्‍त पद्धतीने नष्ट करण्यात आले आहे.

पथकाकडून आढावा
बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी चेन्नई येथील डॉ. तपनकुमार साहू यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. या पथकाने रायगड जिल्ह्यातील पेण, पुणे जिल्ह्यातील नांदे, दौंड तालुक्‍यातील बेरीबेल येथे आढावा घेतला. तसेच बुधवारी बीड आणि परभणी जिल्ह्यांत पाहणी केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Krushiking
Top