चालू घडामोडी
मोठी बातमी! प्रजासत्ताक दिनी दिसणार किसान पॉवर; ट्रॅक्टर रॅलीला दिल्ली पोलिसांची परवानगी

नवी दिल्ली - कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ५७ दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या पंजाब, हरियाना व इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिनी (मंगळवारी) राजधानीतील बाह्य वळण रस्त्यावर ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अखेर आज सायंकाळी परवानगी दिल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी दिली.
यावेळी कोणतीही अप्रिय घटना होणार नाही व रॅलीनंतर लगेचच आंदोलक शेतकरी पुन्हा सीमांवर परततील याबाबत शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून दिल्ली पोलिसांनी रीतसर हमी मागितल्याचेही समजते. ही रॅली ऐतिहासिक असेल व सारे जग ती पाहील असेही पाल यांनी सांगितले. दिल्लीतील वेगवेगळ्या ५ रस्त्यांवर शांततापूर्ण मार्गांनी निघणाऱ्या या रॅलीत किमान सुमारे सात ते आठ हजार ट्रॅक्टर सहभागी होतील असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.
आंदोलनाबाबत तोडगा निघालेला नसतानाच शेतकरी नेत्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. पोलिस अधिकारी व शेतकरी नेते यांच्यात याबाबत ३ बैठका झाल्या. त्यात पोलिसांनी दिलेला पर्यायी मार्गांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला होता. अखेर काल झालेल्या चर्चेअंती दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिल्याचे पाल यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जाहीर केले. ही रॅली शांततापूर्ण मार्गाने काढण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली आहे असे योगेंद्र यादव यांनी सांगितले.
https://t.co/NdLolWm3BE
- Agrowon E Gram (@Agrowonegram) January 23, 2021
धक्कादायक! '२६ जानेवारीला काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीवर गोळीबार करण्याचा आमचा कट होता'@MarathiBrain @MarathiRT
दरम्यान, या रॅलीसाठी पंजाबमधील हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह दिल्लीकडे रवाना होतील असे भारतीय किसान संघटनेचे महासचिव सुखदेवसिंग कोकरीकला यांनी सांगितले. हरियानाच्या करनाल, अंबाला, रोहतक, भिवानी, गुडगाव, कुरुक्षेत्र आदी भागांतून शेतकरी निघाले आहेत.
महाष्ट्राचाही देखावा असणार
प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीचा सविस्तर कार्यक्रम आज (ता.२४) जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय किसान महासंघ व संयुक्त संघर्ष मोर्चाचे हजारो शेतकरी यात सहभागी होतील. संघर्ष मोर्चाच्या वतीने आपला एक चित्ररथही सज्ज केला असून त्यात छत्रपती शिवरायांच्या काळातील महाराष्ट्रातील कृषी संस्कृतीचा देखावा उभारण्यात येणार आहे, असे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.
"पोलिस आम्हाला अडविणार नाहीत. ही ट्रॅक्टर परेड २६ जानेवारीला वेगवेगळ्या ५ सीमा लगतच्या रस्त्यांवर सुमारे १०० किलोमीटरच्या अंतरावरून जाईल. यासाठी जितका वेळ लागेल तेवढा पोलिसांनी आम्हाला दिला आहे."
दर्शनपाल, शेतकरी नेते