Monday, 13 Jul, 1.30 pm ॲग्रोवन ई-ग्राम

चालू घडामोडी
पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या प्रशासकांचे ठरले; महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना संधी

पुणे : जिल्ह्यातील सुमारे ७५० मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तिनही महाआघाडी-सरकार पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून संधी देण्याचे स्पष्ट आदेश तिनही पक्षांना देण्यात आले आहेत. याबाबत तिनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी सर्व तालुकाध्यक्षांना तालुकानिहाय यादी बनविण्याचे आदेश दिले आहेत.

या सर्व याद्या जिल्हाध्यक्ष संकलित करणार असून त्यावर स्थानिक आमदार-खासदार यांच्या शिफारशी जोडून अंतिम याद्या पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करुन जिल्ह्यातील सर्व महाआघाडीचे प्रमुख नेते मिळून हे सर्व ७५० प्रशासक जाहिर करणार आहेत.

याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके या दोघांनीही या माहितीला दुजोरा दिला असून पुढील दहा दिवसात अंतीम ७५० प्रशासक नियुक्त्या करण्याचे ठरल्याचेही दोघांनी सांगितले.

कोरोना संकटामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने राज्यपालांनी २४ जुनच्या परिपत्रकाद्वारे राज्यातील १९ जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले. यात पुणे जिल्ह्यातील खेड (९१), शिरुर (७३), हवेली (५५), आंबेगाव (३०), बारामती (४९), भोर (७४), दौंड (५०), इंदापूर (६१), जुन्नर (६७), मावळ (५८), मुळशी (४५), पुरंदर (६६), वेल्हे (३१) आदी तालुक्यांतील एकुण १४०७ ग्रामपंचायतींपैकी ७५० ग्रामपंचायत निवडणूक होणे अपेक्षित होते.

या सर्व ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्रात संबंधित गावांचे नकाशे अंतिम करणे, तलाठी-ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्थळपाहणीने प्रभाग निश्चित करणे, सीमा निश्चित करणे, अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण निश्चित करणे व तहसिलदारांकडून या सर्व रचनेला मान्यता घेणे. आदी प्रक्रीयाही पूर्ण झालेल्या आहेत.

दरम्यान, या निर्णयानुसार सर्व ग्रामपंचायतींवर ज्या-ज्या पक्षाचे सरपंच आहेत. त्यांना विचारात घेवून त्या-त्या ग्रामपंचायतीत त्याच पक्षाचे प्रशासक नेमले जातील अशी ही प्रक्रीया राबविण्याचे ठरले. दरम्यान ज्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे सरपंच आहेत. त्या ठिकाणी तिनही पक्षाचे पदाधिकारी मिळून महाआघाडी सरकारमधील एका पक्षाचे प्रशासक नेमले जातील याची दक्षता घेण्याच्याही स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Krushiking
Top