Saturday, 23 Jan, 10.23 am KrushiNama

कृषि नामा
राज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना भरपाई अदा करणार - सुनील केदार

मुंबई - राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली.

पशुसंवर्धनमंत्री श्री.केदार म्हणाले, बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत १३० लाख रुपये मंजूर केले आहेत. यात प्रामुख्याने आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी, सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु ७०/- प्रति पक्षी, कुक्कुट पक्षांची अंडी रु. ३/- प्रति अंडे, कुक्कुट पक्षी खाद्य रु. १२/- प्रति किलोग्रॅम, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक रू. ३५/- प्रति पक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक रु. १३५/- प्रति पक्षी , अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा केली जाणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

कुक्कुट पक्षांचे मांस व अडी हा प्रथिनांचा स्वस्तात उपलब्ध होणारा स्त्रोत आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्र वगळून पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहनही श्री. केदार यांनी केले आहे.

प्रेसनोट

बर्ड फ्लू रेागाचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरीयाना, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत. त्या संदर्भात विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या तसेच सोशल मिडीयावरुन बातम्या व माहिती प्रसारीत होत आहे. त्या अनुषंगाने माध्यमांना या बाबतीतील अद्ययावत अधिकृत माहिती देणेसाठी प्रस्तुत प्रेस नोट प्रसिध्दीस देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यात दि. २१.०१.२०२१ रोजी कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, पालघर ५४, रायगड ८, पुणे ३, सातारा ५, नाशिक ४, जळगाव १९८, अहमदनगर १, बीड ११५, जालना १७, नांदेड ८, उस्मानाबाद ४, हिंगोली ९, अमरावती ३३, यवतमाळ ११८, नागपूर २० व गोंदीया २९, अशी कुक्कुट पक्षांमध्ये ६२६ एवढी मरतुक झालेली आहे. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई २, ठाणे ११, पालघर १, रत्नागिरी ३, पुणे ३, सातारा १, बीड ४, नांदेड १, अकोला ४२ व वर्धा १, अशी एकूण ६९ पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई ७, ठाणे १४, रत्नागिरी ४, पुणे ३, सातारा २, अहमदनगर २, बीड ४, व नांदेड येथे १, अशा प्रकारे एकूण राज्यात ३७ मरतुक आढळून आली आहे. महाराष्ट्र राज्यात दि. २१.०१.२०२१ रोजी एकूण ७३२ पक्षांमध्ये मरतुक झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. दि. ८/०१/२०२१ पासून आजतागायत एकूण १४,५२४ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दि. २०.०१.२०२१ रोजी रात्री ७:३० वा., पुर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कुक्कुट पक्षांमधील काही नमुने होकारार्थी आले असून त्यात मौदा ता. कल्याण जि. ठाणे; धुनकी, ता. पुसद जि. यवतमाळ, निंब ता. गोरेगाव जि. गोंदिया, चिंचोडी पाटील ता. जि. अहमदनगर आणि पिंपरी खुर्द, ता. कळमनुरी जि. हिंगोली, अशा प्रकारे पाच जिल्ह्यांतील कुक्कुट पक्षांचे नमुने बर्ड फ्लू साठी होकारार्थी आले आहेत. चाकणी ता. हिंगणघाट जि. वर्धा, येथील एका बदकाचा नमुना बर्ड फ्लू च्या H5N8 स्ट्रेनसाठी होकारार्थी आढळून आला आहे.

कुक्कुट आणि बदक पक्षांमधील नमुने होकारार्थी आल्यानुसार, सदर क्षेत्रास "नियंत्रित क्षेत्र" म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूसाठी सोळा जिल्ह्यातील कुक्कुट पक्षी नमुने होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणाऱ्या सर्व कुक्कुट पक्ष्यांना, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. एकोणतीस ठिकाणांपैकी २५ ठिकाणी कुक्कुट पक्ष्यांना, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा नष्ट करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून ३९४८३ कुक्कुट पक्षी, ८ बदके, ३५५१५ अंडी व ५३०४६ किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परीघातील जाणीव पूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ओपेरेशनल कॉस्ट अंतर्गत १३० लाख रुपये मंजूर केले आहेत. यात प्रामुख्याने आठ आठवडे वयापर्यंतचे अंडी देणारे पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी, सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु. ७०/- प्रति पक्षी, कुक्कुट पक्षांची अंडी रु. ३/- प्रति अंडे, कुक्कुट पक्षी खाद्य रु. १२/- प्रति किलोग्रॅम, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक रु. ३५/- प्रति पक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक रु. १३५/- प्रति पक्षी, अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परीघातील कुक्कुट पालकांना, जाणीव पूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा केली जाईल.

ज्या ठिकाणी कुक्कुट पक्षांव्यतीरिक्त इतर पक्षांमध्ये होकारार्थी निष्कर्ष प्राप्त झाले आहेत, अशा ठिकाणी देखील सर्वेक्षणाचे काम चालू आहे. तसेच ज्या ठिकाणी सॅनिटायझेशन प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आले आहेत, अशा ठिकाणी १ ते १० कि.मी. क्षेत्रामधून कुक्कुट व इतर पक्षातील घशातील, विष्ठा आणि रक्तजल नमुने सर्व्हेक्षणासाठी घेण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाचे पथक डॉ. तपन कुमार साहू, क्वारंटाइन ऑफिसर, चेन्नई यांच्या नेतृत्वाखाली, दि. १७.०१.२०२१ पासून राज्यातील बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यवाहीची पाहणी करण्यासाठी राज्यात दाखल झाले आहे. या पथकाने राज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. तसेच सदर पथकाने राज्यामध्ये पेण (रायगड), नांदे (पुणे), बेरीबेल (दौंड, पुणे) या ठिकाणी दिलेल्या भेटी दरम्यान तेथे केलेल्या रोग नियंत्रणाच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले आहे. दि. २०.०१.२०२१ रोजी सदरील केंद्राच्या पथकाने बीड व परभणी येथील नियंत्रित क्षेत्रास भेटी देवून तेथील रोग नियंत्रणाच्या कार्यवाहीची पाहणी केली आहे.

बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना दि. १२.०१.२०२१ नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मरतुक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून, आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहेत.

या संदर्भात सर्व कुक्कुट पक्षी धारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मर्तूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तूक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती दयावी. मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ च्या कलम ४(१) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा-या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास, त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात काळविणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी बर्ड फ्लू चा उद्रेक झालेला आहे, त्याच ठिकाणी रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी वरील प्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे.

कुक्कुट पक्षांचे मांस व अंडी हा प्रथिनांचा स्वस्त असणारा स्त्रोत आहे. पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, अशी सर्व जनतेस, कृपया आपले माध्यमातून विनंती करणेत यावी.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: KrushiNama
Top