Friday, 11 Jun, 1.10 pm लेटेस्ट ली

महाराष्ट्र
BMC Advisory on Leptospirosis: मुसळधार पावसामुळे मुंबईतील स्थिती पाहून महापालिकेने लेप्टोस्पायरोसिसबाबत जारी केल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

Mumbai Rains (Photo Credits-ANI)

मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक भागात वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण होईपर्यंत पहिल्याच पावसाने मुंबईकरांना सळो की पळो अशी अवस्था निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत साचलेल्या पाण्यातून चालताना योग्य ती काळजी न घेतल्यास लेप्टोस्पायरोसिसचा (Leptospirosis) संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई महापालिकने (BMC) नव्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे की नाही याची खबरदारी मुंबई मनपा घेणार आहे. महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

लेप्टोस्पायरोसिस होण्याची कारणे?

अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात 'लेप्टोस्पायरोसिस' या रोगाचे 'लेप्टोस्पायरा' (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. अशा बाधित झालेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरिराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याश्या जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असेही डॉ. गोमारे यांनी नमूद केले.

महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना

  • ज्या व्यक्ती साचलेल्या पाण्यातून चालल्या असून त्यावेळी ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरिराच्या भागावर जखम होती, अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'मध्यम जोखीम'या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे दररोज एक वेळा याप्रमाणे सलग तीन दिवस सेवन करावयास सांगावयाचे आहे.
  • ज्या व्यक्ती पावसाच्या ‌साचलेल्या पाण्यातून एकदाच चालल्या असून ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरिराच्या भागावर जखम नसेल अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'कमी जोखीम'या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे एकदा सेवन करावयास सांगावयाचे आहे.
  • ज्या व्यक्ती पावसाच्या साचलेल्या पाण्यातून एका पेक्षा अधिक वेळा चालल्या किंवा ज्यांनी साचलेल्या पाण्यात काम केले आहे (उदाहरणार्थ: बचाव कार्य करणारे पालिका कर्मचारी), अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'अतिजोखीम' या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे आठवड्यातून एक वेळा याप्रमाणे सलग सहा आठवडे सेवन करावयास सांगावयाचे आहे.
  • गरोदर स्त्रिया व ८ वर्षांखालील बालकांना डॉक्सीसायक्लीन देऊ नये. त्याऐवजी गरोदर स्त्रियांना ५०० मिलीग्रॅम ऍझिथ्रोमायसिन टॅब्लेट, तर ८ वर्षाखालील बालकांना २०० मिलीग्रॅम ऍझिथ्रोमायसिन सिरप वरील तपशीलानुसार द्यावयाचे आहे.
  • हे प्रतिबंधात्मक औषधोपचार केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे गरजेचे आहे.

'लेप्टोस्पायरोसिस' विषयी महत्त्वाची माहिती

- 'लेप्टोस्पायरोसिस'हा रोग 'लेप्टोस्पायरा' (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतूमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसेच इतर काही प्राणी या रोगाचे स्रोत आहेत.

- मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.

- शहरी विभागात लेप्टोस्पायरा हे सूक्ष्मजंतू उंदीर, कुत्रे इत्यादी प्राण्यांमध्ये आढळतात. संसर्गित जनावरांच्या मूत्राद्वारे दूषित झालेले पाणी वा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो. हा संसर्ग जखम झालेली त्वचा, डोळे, नाक याद्वारे होतो.

- पावसाळ्यात व पूर आल्यानंतर किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांना दूषित पाण्यातून चालावे लागले तर शरिरावरील जखमांमधून या रोगाचे जंतू आपल्या शरिरात प्रवेश करू शकतात.

- पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा 'लेप्टोस्पायरोसिस' असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

- पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.

- साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे.

- साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे 'लेप्टोस्पायरोसिस' संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'लेप्टोस्पायरोसिस' प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.

'लेप्टोस्पायरोसिस' हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे याबाबत वेळीच प्रतिबंधात्मक औषध उपचार करणे गरजेचे आहे.

- ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा.

- उंदीर- घुशींचा नायनाट करावा. उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे.

- घरात व आजुबाजूला कचरा साठणार नाही, याची दक्षता घ्यावी व कच-याची नियमितपणे विल्हेवाट लावावी.

- आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे लेप्टो प्रतिबंधात्मक लसीकरण व इतर आवश्यक ते लसीकरण पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वेळच्यावेळी व नियमितपणे करवून घ्यावे.

या सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घेण्यात यावी असे आवाहन मुंबई मनपाकडून करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top